ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन केलं. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे यांच्यासह काही आंदोलक यावेळी थेट समुद्रात उतरले. पोलिसांनी वेळीच या आंदोलकांना समुद्राबाहेर काढलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली.. दरम्यान लक्ष्मण हाकेंसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मुंबईच्या समुद्रात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी हे असं जलसमाधी आंदोलन केलं. महायुती सरकार ओबीसींना न्याय देत नाही असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. ओबीसींवर सरकार अन्याय करतं हे सांगताना लक्ष्मण हाकेंनी शिंदे फडणवीसांना सोडून अजितदादांवरच टीका केलीय. अजितदादा हाय हाय च्या घोषणा देतानाच त्यांनी अजितदादांबाबत असंसदीय शब्द वापरला.
लक्ष्मण हाकेंनी सरकारविरोधात भूमिका घेताना तीनही पक्षांवर टीका करणं अपेक्षित आहे. पण हाके हे भाजप आणि शिवसेनेला काहीही बोलत नाही. उलट राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर टीका करताना ते कंबरेखालची टीका करतात. राष्ट्रवादीनंही हाकेंच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलंय. हाकेंना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही हाकेंच्या टीकेवर आश्चर्य व्यक्त केलंय. अजितदादा कायम ओबीसींच्या कल्याणासाठी झटत असल्याचा दावा त्यांनी केलाय.
अजितदादा सत्तेत असले तरी सत्तेच्या सावलीला असलेले लक्ष्मण हाके त्यांना पाण्यात पाहतात. धनगर नेते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकरही अजितदादांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. सदाभाऊ खोतही अजितदादांबाबत फारकाही चांगलं बोलतात असं नाही. लक्ष्मण हाकेंचं आंदोलन आणि त्यांनी अजितदादांवर केलेली टीका कशासाठी असा प्रश्न निर्माण झालाय.