Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'मोदी स्वत: स्वयंसेवक, पण...'; 'भारतीय सैन्यापेक्षा RSS स्वयंसेवक अधिक तेजस्वी'वरुन राऊतांचा टोला

Sanjay Raut On Operation Sindoor Indian Army RSS: संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीमध्ये सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना टोला लगावला आहे.

'मोदी स्वत: स्वयंसेवक, पण...'; 'भारतीय सैन्यापेक्षा RSS स्वयंसेवक अधिक तेजस्वी'वरुन राऊतांचा टोला

Sanjay Raut On Indian Army RSS: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांला शाब्दिक चिमटा काढला आहे. 'सामना'मधील आपल्या 'रोखठोक' सदरामधून राऊतांनी संघाची भारतीय लष्कराशी केलेल्या तुलनेवरुन टोला लगावल्याचं पाहायला मिळत आहे. युद्धासंदर्भात बोलताना राऊतांनी पंतप्रधान मोदी भारतीय सैन्याचे शौर्य आणि कौशल्याचे श्रेय घेतील असंही म्हटलं आहे.

काय करायचे?

"भारताचे सैन्य प्रोफेशनल आहे. ती खोगीर भरती नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकदा सांगितले होते, भारतीय सैन्यापेक्षा संघाचे स्वयंसेवक अधिक तेजस्वी आणि वेगवान आहेत. युद्धासाठी ते अधिक वेगाने तयार होतील. भारतीय सैन्याचा हा अपमान असल्याचा आरोप तेव्हा झाला. स्वत:च्या क्षमतेविषयी या भ्रामक समजूती आहेत," असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे त्यांनी, "पंतप्रधान मोदी हे स्वत: संघाचे स्वयंसेवक आहेत, पण त्यांनी युद्ध करण्याची जबाबदारी भारतीय सेनादलावर सोपवली. अर्थात भारतीय सैन्याचे शौर्य व कौशल्याचे श्रेय मोदी नक्कीच घेतील. राजकीय उदोउदो नक्कीच होईल. त्याला काय करायचे?" असा सवालही उपस्थित केला आहे.

...म्हणून सैन्यात धर्म आणि राजकारण आणू नका असं सांगितलं जायचं

"युद्धात कोण कोणाच्या बाजूने याला महत्त्व आहेच. महाभारतात ते महत्त्व कृष्ण आणि कर्णाला आलेच होते. आता पाकिस्तानच्या बाजूने चीन उभा आहे. म्हणजे पाकिस्तान एकाकी नाही. अमेरिका, रशिया, जपानसारख्या राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिला. मात्र प्रत्यक्षात युद्ध भारतीय सैन्यालाच लढायचे आहे. नेपोलियन ज्या बाजूला असेल त्या बाजूला लाखभर सैन्य जास्त आहे असे धरून चालण्याची प्रथा तेव्हा होती. हे बळ कुशल सेनापतींमुळे एखाद्या राष्ट्राला चढते. पाकिस्तानचा सध्याचा सेनापती मुनीर हा आधी वल्गना करत होता. आता त्याचा ठावठिकाणा लागत नाही. युद्ध जोरात चालले आणि दीर्घकाळ चालले म्हणजे मग सेनापतीच्या लायकी-नालायकीची परीक्षा होऊ लागते. सैन्य हे सेनापतीच्या हुकूमावर चालते हे पहिले व सैन्य हेच सेनापतीचे शस्त्र असते हे दुसरे. ते जर त्याला नीट वापरता आले नाही तर कितीही बलाढ्य राष्ट्र असले तरी त्याचा उपयोग नाही. सैन्यात धर्म आणि राजकारण आणू नका, असे जे सांगितले गेले ते यासाठीच," असं राऊत म्हणालेत.

गाढवांच्या नेतृत्वाखाली लढणारे सिंह

"पहिल्या महायुद्धाच्या वेळच्या ब्रिटिश पंतप्रधानांनी लिहिलेल्या आठवणी मार्गदर्शक आहेत. पाश्चेंडेलेच्या रणांगणावर अक्षरश: चिखलामध्ये आपल्या सैनिकांना घालून मारल्याबद्दल त्यांनी ब्रिटिश सेनापतींवर ठपका ठेवला आहे. आपण आपल्या सैनिकांना कोठे पाठवत आहोत याचा विचार करण्याची तसदीसुद्धा तेव्हाच्या वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांनी घेतली नाही. सैन्य पुढे आणि सेनापती पन्नास मैल मागे असे चित्र होते. सेनापतीने आघाडीवर जाण्यात धोका असतो हे खरे, पण सेनापतीने धोका पत्करायचाच असतो. दोन-चार सेनापती मारले गेले असते तर त्याने काय दुनिया ओस पडत नव्हती, असे लाईड जार्ज यांनी म्हटले आहे. पहिल्या महायुद्धाबद्दल अमेरिकन जनरल शेरमान याने लिहिलेल्या पुस्तकाचे नावच ‘Lions Led By Donkeys’  असे आहे. गाढवांच्या नेतृत्वाखाली लढणारे सिंह या मथळ्यावरूनच सेनापतींच्या लायकीबद्दल मत व्यक्त होते," असंही राऊतांनी म्हटलं आहे.

प्रत्यक्ष युद्धकाळात युद्धभूमीवरून कशा खोट्या बातम्या दिल्या जातात

"पहिल्या महायुद्धाच्या काळातल्या ब्रिटिश पंतप्रधानांनी लिहिलेल्या आठवणी गमतीशीर आहेत. पहिले महायुद्ध चालू असताना ब्रिटिश वर्तमानपत्रात अमुक एका सेनापतीने अमक्या लढाईत फार मोठा पराक्रम केला, अशी बातमी छापून आली होती. त्या वर्तमानपत्राच्या अंकाचा फोटो त्याने आपल्या पुस्तकात छापला आणि त्याखाली एक टीप अशी दिली की, `जी लढाई कधी लढलीच गेली नाही, त्या लढाईमध्ये मोठा विजय संपादन केल्याबद्दल राजकीय कारणासाठी सेनापतीची पाठ कशी थोपटली जाते पहा. अशी लढाई खरोखर झाली की नाही याबद्दल खात्री करून घ्यायची असेल तर वाचकांनी युद्धाचा जो अधिकृत इतिहास प्रसिद्ध झाला आहे तो चाळून पाहावा. त्यात अशा कुठल्याच लढाईचा उल्लेख सापडायचा नाही. कारण ही लढाई झालीच नाही; प्रत्यक्ष युद्धकाळात युद्धभूमीवरून कशा खोट्या बातम्या दिल्या जातात आणि पंतप्रधानांनाही कसे फसवतात याचे उदाहरण देऊन लाईड जार्ज यांनी मोठ्या वैतागाने उद्गार काढले की, “I, the Prime Minister of Great Britain was kept ignorant of these Facts; पंतप्रधानांपासून युद्धभूमीवरचे सत्य कसे दडवून ठेवण्यात येते हे इंग्लंडसारख्या राष्ट्रात सतत घडत होते," असा ऐतिहासिक संदर्भ देत राऊत यांनी देशाच्या नेतृत्वावर भाष्य केलं आहे.

 

Read More