India Pakistan War PM Modi: भारत आणि पाकिस्तानदरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थितीने शस्रसंधी झाल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर चांगलेच खवळले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत असं म्हणणाऱ्या राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना थेट केंद्र सरकारच्या भूमिकेवरुन निशाणा साधला. भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत घालून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच भारताला नेमका कोणत्या देशांनी पाठिंबा दिला आहे हे जाहीर करावं अशी मागणीही राऊत यांनी केली. तसेच पहलगाममध्ये 26 महिलांचं कुंकू पुसणारे दहशतवादी कुठे आहेत? असा सवालही राऊतांनी 'ऑपरेशन सिंदूर'वरुन विचारला आहे.
"ज्यांचा सिंदूर पुसला त्याचा आणि हुतात्माचा अपमान यांनी केलेला आहे. माघार घ्यायची गरज नव्हती. आपण टोकाला जाऊन पोचले असताना अशा प्रकारचा घात करणे हे कोणाच्यातरी दबावखाली आणि कोणाला तरी फायदा पोहोचावा यासाठी युद्धबंदी जाहीर केली. भारत सरकारने काहीच केलं नाही. भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत घालून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहे? नुकसान पाकिस्तानचं झालं नाही आमचं झाले आहे ट्रम्पने इस्राइल व गाझापट्टी युद्ध का नाही थांबवलं? ट्रम्प ठामपणे इस्रायलच्या मागे उभे आहेत. मात्र मोदींचे मित्र ट्रम्प भारताच्या मागे उभे राहिले नाहीत. दोन्ही देशांसोबत चांगले संबंध आहेत असे त्यांनी सांगितले. मोदी पाचशे देश फिरून आले मात्र भारताचा मित्र कोण त्यांनी सांगावं. या युद्धाला ठामपणे पाठिंब देणारा एकही देश दाखवा," असा घणाघात राऊतांनी केला आहे.
"चीन, तुर्कीए यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. मात्र मोदी जगात फिरत असतात तरी कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे भारताला? हे सरकारने जाहीर करावं. यासाठी सर्व पक्ष बैठक घ्यायला हवी," अशी मागणीही राऊतांनी केली.
"ज्यांनी 26 महिलांचं सिंदूर पुसलं ते आतंकवादी कुठे आहेत? 26 महिलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही. ते आतंकवादी कुठे आहेत? कोणी गुडघे टेकले? आमचे दुर्दैव आहे की असे राज्यकर्ते आम्हाला लाभले," अशा शब्दांमध्ये राऊतांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला.
"लोकांना इंदिरा गांधींची आठवण येते. 71 साली अमेरिकेच्या प्रेसिडेंटला त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही कोणताही निर्णय घ्या आणि पाकिस्तान बरोबर युद्ध करणार. युद्ध करुन त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला पाहिजे. मोदी यांनी देशासोबत विश्वासघात केला आहे," असं राऊत म्हणाले.
"अमित शहा गृहमंत्री असताना अजूनही अतिरेकी सापडले नाही त्यांचंही राजीनामा घेतला पाहिजे. मोहन भागवत यांनी प्रवचन देऊ नये. ते राष्ट्रभक्त असतील तर सगळ्यात अगोदर त्यांनी राजीनामा मागावा," असा खोचक सल्ला राऊतांनी दिला आहे.
"आज इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तान राहिलं नसतं. पाकिस्तानचे सैन्य गुडघे टेकलेले आम्ही पाहिलेले आहेत. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी यांच्यावरती हे फक्त घाणेरडे भाषण करतात. त्यांच्या पायाचे तीर्थ पिण्याची तुमची लायकी नाही," अशी टीका राऊत यांनी केली आहे.