Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

पुन्हा हनीट्रॅपचा मुद्दा उपस्थित, पटोलेंनी पेनड्राईव्हही दाखवला

नाना पटोलेंनी सभागृहात दाखवलेल्या पेनड्राईव्हवर स्पष्टीकरण देखील दिलं आहे. 

पुन्हा हनीट्रॅपचा मुद्दा उपस्थित, पटोलेंनी पेनड्राईव्हही दाखवला

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : आज पुन्हा एकदा हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. नाना पटोलेंनी सभागृहात पेनड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅपचं प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत कारवाईची मागणी केली आहे. तसंच हनी ट्रॅपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार नाना पटोले पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आजही नाना पटोलेंनी सभागृहात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित करत थेट पेनड्राईव्ह बॉम्बच डागला. नाना पटोलेंनी विधासभाध्यक्षांना पेनड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅपचा मुद्दा अतिशय गंभीर
असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधला. हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सरकार साधं निवेदन देखील करायला तयार नसल्याचं पटोलेंनी म्हटलं आहे. तर हनी ट्रॅपचं प्रकरण गांभीर्यानं घेतलं असल्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंकडून देण्यात आलं.

नाना पटोलेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देत प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं म्हटलं आहे. मात्र, हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून  मंत्र्यांमध्येच समन्वय नसल्याचा आरोप भास्कर जाधवांकडून करण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम वेगळं सांगताय आणि एकनाथ शिंदे वेगळं बोलत आहेत. त्यामुळे ते जनतेशी दिशाभूल करत असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलं आहे. 

नाना पटोलेंनी सभागृहात दाखवलेल्या पेनड्राईव्हवर स्पष्टीकरण देखील दिलं आहे. पेनड्राईव्हच्या माध्यमातून कोणाला ब्लॅकमेल करायचं नाही आहे. राज्याचे मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅपमध्ये फसले आहेत. त्यामुळे राज्यातील असामाजिक तत्वांकडे राज्याचे महत्त्वाचे कागदपत्र पोहोचल्याचा दावाही नाना पटोलेंनी यावेळी केला आहे. 

मुंबई, ठाणे, पुणे, नाशकात हनी ट्रॅपच्या गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल असल्याची माहिती आहे. हनी ट्रॅपच्या मागे कोणती गँग आहे? त्या गँगचा पर्दाफाश करून कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. तसंच अधिकारी, आमदारांनी देखील जबाबदारीनं वागावं
असा सल्ला रोहित पवारांकडून देण्यात आला आहे. 

हनी ट्रॅपची प्रकरणं मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यात आता मंत्री, आमदार आणि सरकारी अधिकारी अडकल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणी कोणतं पाऊल उचलणार आणि या हनी ट्रॅपच्या गँगचा पर्दाफाश करणार का? याकडे आता लक्ष लागलं आहे. 

Read More