मुंबई : शिवसेना-भाजपा युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याचबरोबर सरकारवर ३ चाकी गाडी अशी टीकाही केली आहे. अनैसर्गिक आघाडी फक्त शरद पवारांमुळे एकत्र आहे. बघुयात किती दिवस ही टिकते आहे, अशी टीका पूनम महाजन यांनी केली आहे. नव्या सरकारवर भाजप नेत्यांकडून टीका सुरु झाली आहे. याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी देखील महाविकासआघाडीवर टीका केली होती.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांचे हार्दिक अभिनंदन.
— Poonam Mahajan (@poonam_mahajan) November 28, 2019
महाराष्ट्र राज्याची प्रगतीपथावरील वाटचाल सुरू ठेवण्याकरिता शुभेच्छा!
सत्ता गेल्यानंतर भाजप आणि भाजप नेते महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. नव्या सरकारचं बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं टीकेची झोड उठवली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्या सरकारवर ट्विटरवर टीका केली आहे. कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.