Rahul Gandhi Disqualification : महाराष्ट्र विधान भवन परिसरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. सत्ताधाऱ्यांचेही राष्ट्रीय नेते आहेत आणि आमच्याकडेही जोडे आहेत, असा इशारा त्यांनी दिला. सत्ताधारी आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पाठिशी घातल आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे ते वेळकाढू धोरण काढत आहेत. सरकार काहीही कारवाई करत नसल्याने महाविकास आघाडीने या संदर्भात सभात्याग केला, अशी माहिती थोरात यांनी दिली.
यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही संपात व्यक्त केला. राज्यातील सरकार सकारात्मक काहीच बोलत नाही. काहीही निर्णय घेत नाही. विधानसभेचे अध्यक्ष हेही काहीही निर्णय घेत नाहीत, सरकारचा हा एककल्ली कारभार चालला आहे. त्याचा महाविकास आघडीकडून निषेध करण्यात येत आहे. विधानभवन परिसरात राष्ट्रीय नेत्यांचा अपमान करणाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून वॉकआऊट केले.
आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत एवढं लक्षात ठेवा, आम्ही आजवर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन केले.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) March 23, 2023
ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात हे सत्ताक्षाने लक्षात ठेवावे.
स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या बाजूने लढणारे तुम्ही, आम्हाला काय शिकवणार? pic.twitter.com/c3JL8koQN2
दरम्यान, राहुल गांधी यांची लोकसभा सदस्य रद्द केल्यामुळे काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाणार आहे. ओबीसींच्या अपमानाची नौटंकी भाजपतर्फे केली जात आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर तोंडाला काळी पट्टी बांधून काँग्रेसच्या आमदारांनी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आदित्य ठाकरेही हाताला काळी पट्टी बांधून पायऱ्यांवर सरकारचा निषेध केला.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून, भाजपने सूडबुद्धीने त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी तोंडाला काळी रिबीन बांधून पायऱ्यांवर मूक आंदोलन केले. pic.twitter.com/6uOUXyEbdU
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 25, 2023
राहुल यांची खासदारकी रद्दच्या निर्णयावरुन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज जे सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांना भविष्यात विरोधी पक्षात जावं लागेल. त्यावेळी त्यांची अवस्था काय होईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. दरम्यान, राहुल यांच्या विरोधात भाजपचा ओबीसी सेल आक्रमक झाला आहे. महाराष्ट्र राज्यात 6 एप्रिलपासून राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.