Bullet Train Mumbai: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील एकमेव भूमिगत स्थानक असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकाचे 76 टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. या स्थानकाचा व्हिडिओ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी बुलेट ट्रेनच्या मुंबई स्थानकाची पाहणी केली. आत्तापर्यंत 14.2 लाख घनमीटर मातीचे खोदकाम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू आहे. 508 किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्प असून नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम करीत आहे. महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये बुलेट ट्रेनची कामे सुरू आहेत. या मार्गातील मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे २१ किमी लांबीचा वांद्रे - कुर्ला संकुल - शीळफाटा बोगदा. समुद्राखालून हा बोगदा आहे.
वांद्रे कुर्ला संकुल -शिळफाट्यादरम्यान २१ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ठाणे खाडीतील ७ किमी लांबीचा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे. बुलेट ट्रेनसाठी खोदण्यात येणारा बोगदा अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गासाठी एकच असणार आहे. सी -२ पॅकेजमध्ये बोगद्याजवळ ३७ ठिकाणांवर ३९ उपकरणांच्या खोलीची निर्मिती केली आहे. बोगद्यासाठी १३.१ मीटर व्यासाच्या कटर हेड टीबीएम यंत्राचा वापर केला जात आहे. बोगद्याच्या २१ किमीपैकी १६ किमी भागासाठी तीन टनेल बोअरिंग यंत्रांचा वापर करण्यात आला असून उर्वरित ५ किमीच्या भागासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. हा बोगदा जमिनीपासून सुमारे २५ ते ६५ मीटर खोल आहे. त्याचा सर्वात खोल भाग शिळफाटाजवळ पारसिक डोंगराच्या खाली ११४ मीटर जमिनीखाली असेल.
Bandra Kurla Complex station - only underground station of Bullet train project.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) May 3, 2025
- 75% excavation work completed (14 lakh cubic meters)
- 100% secant piling done (3384 nos.)
- 2.7 lakh cubic meters of concrete work completed
- Side wall strengthening work done pic.twitter.com/dZxHXWhtP4
बुलेट ट्रेन सुरू होण्यासाठी आणखी तीन वर्ष लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2028 पर्यंत बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
508 किमी लांबीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान वेळेची बचत होऊन 6 ते 8 तासांनी कमी होऊन फक्त 3 तासांत पूर्ण होणार आहे. 2026मध्ये सूरत आणि दक्षिण गुजरातच्या बिलिमोरा दरम्यान 50 किमी मार्गावर बुलेट ट्रेनची पहिली चाचणी होणार आहे. या कॉरिडोरवर एकूण 12 स्थानके असणार आहेत. मुंबईत भूमिगत स्थानक असणार आहे. तर ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमतीमध्ये एलिवेटेड स्थानक बनवण्यात येणार आहेत.