Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन', आठवलेंचं भाकीत

राष्ट्रवादीच्या वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी या चर्चांना आणखी वाव देत आहेत. 

'गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन', आठवलेंचं भाकीत

मुंबई : पार्थ अपरिपक्व आहे, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर राजतीय वर्तुळात अनेकांच्याच भुवया उंचावल्या. बुधवारी अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याबाबत शरद पवारांनी जाहीरपणे केलेलं हे वक्तव्य पाहता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी या चर्चांना आणखी वाव देत आहेत. त्याचबाबत आता रिपाईचे रामदास आठवले यांनीही आपलं मत मांडलं आहे. 

महाविकासआघाडीच्या भवितव्याशीच या घडामोडी जोडत आठवले यांनी एक लक्षवेधी भाकीत केलं आहे. पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. पुढं तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वाद आणि बंडाळींमुळं याचे थेट परिणाम हे महाविकासआघाडी सरकारवर होतील असं आठवले यांनी स्पष्ट  केलं. 

इतकंच नव्हे तर सध्याच्या सर्व घडामोडी पाहता महाविकासआघाडी सरकारच्या भवितव्याचं काही खरं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवाय मयायुतीच्या बाजूनं कौल देत यंदाच्या वर्षी श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकासआघाडी सरकारचंही विसर्जन होईल आणि पुन्हा महायुतीचं सरकार येईल, असं भाकीत त्यांनी केलं. 

 

आठवलेंनी केलेलं हे भाकीत पाहता आता पुढं काय? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच पार्थ पवार आता मोठा निर्णय घेणार असल्याचंही वृत्त हाती आलं आहे. त्यामुळं आता पार्थ पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असेल. दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यावर अजित पवार आणि पार्थ पवार तसंच राष्ट्रवादीकडूनही अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

 

Read More
;