Ranvir Shorey on MNS: मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलण्यावरुन मिरा रोडमध्ये मारवाडी रेस्तराँ मालकाला मारहाण केल्यानंतर तेथील वातावरण तापलं आहे. मनसेविरोधात मीरा-भाईंदरमध्ये जैन, मारवाडी, गुजरात व्यापारी संघटनेने बंदची हाक दिली आहे. शेकडो व्यापारी व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान या घटनेवरुन अभिनेता रणवीर शौरीने टीका केली आहे. कायदा सुव्यवस्था नेमकी कुठे आहे? अशी विचारणा त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत केली आहे. तसंच त्याने मनसे कार्यकर्त्यांना राक्षस म्हटलं आहे. तसंच या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं आहे.
अभिनेता रणवीरने एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, "हे फार त्रासदायक आहे. राक्षस मोकाट सुटले आहेत. त्यांना लक्ष वेधून घ्यायचं आहे, राजकीय फायदा उचलायचा आहे, कायदा सुव्यवस्था कुठे आहे?".
रणवीरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट केल्या. यामधील एकाने त्याला विचारणा केली की, "तू कधीपासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहेस? मराठी शिकण्यासाठी तू किती मेहनत घेतली आहेस?".
रणवीरने त्याला उत्तर देताना आपण भाषेच्या विरोधात नाही, मात्र लोकांना शिकवायचं असेल तर इतरही मार्ग आहेत असं म्हटलं आहे. "आधी तर, मी तुमच्यासारख्या द्वेषपूर्ण अज्ञात ट्रोलर्सना यापैकी कोणत्याही प्रश्नांसाठी उत्तर देण्यास पात्र नाही. दुसरं म्हणजे, जर तुम्हाला वाटत असेल की लोकांना मारहाण केल्याने ते एखादी भाषा शिकतील आणि बोलतील, तर तुम्ही खरोखरच मूर्ख आहात," असं उत्तर त्याने दिलं आहे.
पुढे त्याने म्हटलं की, "जर तुम्हाला या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं असेल, तर फक्त उपजीविकेचा प्रयत्न करणाऱ्या दुर्दैवी नागरिकांना मारहाण करण्याऐवजी, बदल घडवून आणण्याचे किंवा राजकीय स्वार्थासाठी निषेध करण्याचे अधिक सकारात्मक आणि रचनात्मक मार्ग आहेत".
First, I’m not answerable to a hateful anonymous troll like you for any of these questions.
— Ranvir Shorey (@RanvirShorey) July 2, 2025
Second, you’re really dumb if you think beating people up will make them learn and speak a language.
And finally, if you do want to bring attention to the issue, there are more positive…
रणवीर शेवटचा जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या कन्नेडा या वेब सिरीजमध्ये दिसला होता. तो बिग बॉस ओटीटी 3 या रिअॅलिटी शोचा दुसरा रनर-अप होता.सना मकबुल या सीझनची विजेती होती.
माजी व्हिडिओ जॉकी असलेल्या रणवीरने आजा नचले, खोसला का घोसला, लक्ष्य, भेजा फ्राय, सिंग इज किंग, बॉम्बे टॉकीज, सोनचिरिया, मंटो, लूटकेस यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.