Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अभिनेते ऋषी कपूर पंचत्वात विलीन

वयाच्या 67व्या वर्षी त्याचं निधन झालं.

अभिनेते ऋषी कपूर पंचत्वात विलीन

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 67व्या वर्षी त्याचं निधन झालं. मुंबईतील चंदनवाडी स्मशानात इलेक्ट्रिक प्रणालीद्वारे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजीव कपूर, रणधीर कपूर, नीतू कपूर, सैफ अली खान, करीना कपूर, आलिया भट्ट, अभिषेक बच्चनसह 20 जण सामिल झाले होते. 

तर ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सामील होऊ शकली नाही. रिद्धिमा साऊश ईस्ट दिल्लीतील फ्रेंड्स कॉलनी ईस्ट येथे राहते. रिद्धिमाला मुंबईत येण्यासाठी पोलीस मूवमेंट पास जारी करण्यात आला. रिद्धिमा कपूर प्रायव्हेट जेटने सांयकाळी 6 वाजता मुंबईत पोहचणार असल्याची माहिती मिळत आहे.

ऋषी कपूर यांना बुधवारी सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने एच.एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन वर्षांपासून ते ल्यूकेमियाशी (leukemia) झुंज देत होते. रुग्णालयात डॉक्टरांनी शेवटपर्यंत त्यांच्यासाठी प्रयत्न केले मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. 

२०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. मध्यंतरी त्यांनी परदेशात जाऊन उपचार करून घेतले होते. यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये ऋषी कपूर भारतात परतले होते. 

ऋषी कपूर एक उत्तम नट होतेच शिवाय ते एक परखड व्यक्तीमत्व म्हणूनही त्यांची ओळख होती. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. सोशल मीडियामधून त्याच्या या परखड, स्पष्टवक्तेपणाची अनेक उदाहरणं समोर आली. ऋषी कपूर नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरुन ऍक्टिव्ह असायचे. नेहमी ट्विटरद्वारे ते आपलं मत व्यक्त करायचे. कोरोनामुळे लॉकडाऊन काळातही त्यांनी एक ट्विट केलं आणि तेच त्याचं अखेरचं ट्विट ठरलं.

 

Read More