Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात हजार पानांची चार्जशीट कोर्टात दाखल केली आहे. बांगलादेशी नागरिक असलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामविरोधातील पुरावे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत. चार्जशीटमध्ये अनेक बाबी या धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. चार्जशीटनुसार, सैफ अली खानच्या घरात सापडलेले फिंगर प्रिंट्स आरोपी शरीफुल इस्लामचे नसल्याचे समोर आले आहे. घरात सापडलेले बोटाचे ठसे हे आरोपी शरीफुलच्या बोटांशी जुळत नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सैफच्या घरातून 20 फिंगरप्रिंट्स गोळा केले होते. ते फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यातील 19 बोटांचे ठसे शरीफुलच्या बोटांशी जुळत नसल्याचे समोर आले आहे.
चार्जशीटनुसार, बाथरुमचा दरवाजा, बेडरुमचे स्लायडिंग दरवाजा आणि कपाटावर सापडलेले फ्रिंगरप्रिंट आरोपीच्या बोटांशी जुळत नाहीयेत. आरोपीचा एक्त एक फिंगरप्रिंट मॅच झाला आहे. बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावरुन हे फिंगरप्रिंट घेण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रानुसार फिंगरप्रिंट सापडण्याची शक्यता हजारातून एक असते. कारण एकाच गोष्टीला अनेक जण स्पर्श करतात. त्यामुळं फिंगरप्रिंट मॅच न होणं हा कोणताही ठोस पुरावा ग्राह्य धरू शकत नाही.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या जामीन याचिकेचा विरोध केला आहे. मुंबई कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या मणक्याजवळ चाकू हल्ला करण्यात आला होता. घटनास्थळी सापडलेला चाकू, सैफ अली खानच्या पाठीतून काढण्यात आलेला चाकूचा तुकडा आणि आरोपीच्या ताब्यातील चाकूचा तुकडा हे तिन्ही तुकडे एकाच चाकूचे असल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.
अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी वांद्रे येथील घरी दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम फकीर (वय ३०) याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याच्या मोबाईल स्कॅनिंगमध्ये अनेक नवीन गोष्टी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये त्याने छत्तीसगडच्या दुर्ग येथून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) ने या प्रकरणातील चुकीच्या संशयिताला पकडल्याचा युट्यूब व्हिडीओ पाहिला. तसेच स्क्रीनशॉटही काढल्याची माहिती आहे. वांद्रे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, फकीरचा मोबाईल स्कॅन केल्यानंतर या बाबी उघडकीस आल्या आहेत.