Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

संजय राऊत म्हणतात, जिथं जातो तिथं घाण करतो, याचा तर 'टॉयलेट'...

किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद होण्यापूर्वीच शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी सोमय्या याना इशारा दिलाय.

संजय राऊत म्हणतात, जिथं जातो तिथं घाण करतो, याचा तर 'टॉयलेट'...

मुंबई : INS विक्रांत बचाव (Save INS Vikrant) मोहिमेत भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 58 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा ठाकरे सरकारला इशारा देत आणखी एक घोटाळा महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या हा घोटाळा बाहेर काढणार आहेत. 

मात्र, किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद होण्यापूर्वीच शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी सोमय्या याना इशारा दिलाय. ज्यांनी घोटाळे केले आहेत. त्यांनी घोटाळ्यावर काही बोलू नये. दाऊद इब्राहिम याने देशप्रेमावर काही बोलले तर ते लोंकाना पचणार नाही. तसेच, तुम्हीच घोटाळ्यावर बोलणार असाल तर ते लोकांना पचणार नाही असा टोला राऊत यांनी लगावला. तुम्ही जे घोटाळे केले त्याचे उत्तर द्या, अशी मागणीही त्यांनी केली.   

युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही काय घोटाळा केला तो आता बाहेर काढणार आहे. हे प्रतिष्ठान सोमय्या यांची पत्नी श्रीमती सोमैया आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आहे. पर्यावरणाच्या नावाखाली या प्रतिष्ठानने आणि सोमय्या याने १०० कोटींचा घोटाळा केला आहे.

आयएनएस विक्रांतचे पैसे हडप केले. तो पैसा जिरविण्यासाठी मीरा-भाईंदर येथे १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केला का? असा सवाल राऊत यांनी केला. सोमय्या याचा हा 'टॉयलेट घोटाळा' लवकरच बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी सोमैया याच्या घोटाळ्याची दखल घ्यावी. कधी तरी त्यावरही ट्विट करावे. देवेंद्र फडणवीस यांनी आता यावर बोलावे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही असे ते सारखे म्हणत असतात. मग, सोमय्या यांच्याविरोधात कारवाई का करत नाही अशी टीका राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली. 

Read More