उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वरळीत विजयी मेळावा पार पडल्यानंतर आता पुढे दोन्ही ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात एकत्र राहणार असल्याचं सूचक विधान करत युतीचे संकेत दिले आहेत. मात्र ही युती मुंबई महापालिका निवडणुकीत असेल की विधानसभा यासंदर्भात त्यांनी काहीही अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही. यादरम्यान खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.
"मी असं म्हणत नाही की शिवसेना मनसे एकत्र निवडणूक लढत आहे. पण एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासकरुन मुंबई महापालिका निवडणूक लढावी यासाठी लोकांचा दबाव आहे. 5 जुलैला वरळीत विजयी रॅलीत ते चित्र दिसलं आहे. इंडिया आघाडी, महाविकास आघाडीची स्थानिक निवडणुकीत गरज नाही. स्थानिक मुद्दे असल्याने स्थानिाकांवर सोडावं लागेल. मुंबईला वाचवायचं असेल तर राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना एकत्र येऊन निवडणूक लढावी लागेल ही लोकांची मानसिकता आणि दबाव आहे", असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांना माध्यमांशी न बोलण्याबद्दल दिलेल्या आदेशावर ते म्हणाले की, "राज ठाकरेंची काम करण्याची एक पद्धत आहे. आम्ही जाहीर बोलतो, ते बोलत नसतील. पण येणाऱ्या काळात काय होत आहे हे कळेल".
दीपक केसरकर म्हणजे 10 पक्ष फिरुन आलेला माणूस, त्याला उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं. हा बेईमान माणूस आहे. सावंतवाडीत मोती तलाव आहे. त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात. त्यातला तो एक कावळा आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
मोहन भागवतांच्या विधानाबाद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "मी यासंदर्भात एक रोखठोक लिहिलं होतं. नरेंद्र मोदी जेव्हा प्रथम संघ मुख्यालयात गेले तेव्हा सरसंघचलाक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली याचा सारांश टाकला होता. त्यात नरेंद्र मोदींनी स्वत: किंवा संघाने जो नियम केला आहे त्याची आठवण करुन देण्यात आली. 75 वय झाल्यानंतर सत्तेच्या पदावरुन निवृत्ती स्विकारावी". आपले मार्ग मोकळे कऱण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह यांच्यासारख्या अनेक नेत्यांवर जबरदस्तीने आपल्या स्वार्थासाठी निवृत्ती लादली असा आरोपही राऊतांनी यावेळी केला.
"सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पांढरी झाली आहे, डोक्यावरील केस उडाले आहेत, जगभ्रमण करुन झालं आहे, सत्तेची सर्व सुखं उपभोगली आहेत. 75 वर्षानंतर निवृत्तीचा जो नियम केला आहे, त्यासंदर्भात संघ त्यांना वारंवार सूचना देत आहेत. तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हाती सोपवावा लागेल," असंही ते म्हणाले.