उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी एकदा रविवारचं मेगाब्लॉक वेळापत्रक जरुर पाहा. महत्त्वाचं म्हणजे हा मेगाब्लॉक कोणत्या वेळेत आणि कोणत्या स्थानकांवर असेल याचा तपशील येथे पाहायला मिळेल. मध्य रेल्वे, मुंबई विभागामार्फत येत्या रविवारी 3 ऑगस्टला उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजेपासून ते दुपारी ०३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मध्य रेल्वे माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर असणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यत हा मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील लोकलची वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. परिणामी लोकल १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप-डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत हा मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी-नेरुळ मार्गावरुन प्रवास करु शकतात.
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत असणार आहे. ब्लॉक दरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकलची वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय लोकल रद्द केल्या आहेत. काही चर्चगेट लोकल बांद्रा, दादर स्थानकापर्यत धावणार असून तेथूनच रिटर्न चालविण्यात येणार आहे.