Thackeray Family Emotional Movement: तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे - यांनी आज वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजित 'मराठी विजय मेळाव्या'त एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या बंधूंनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठीप्रेमी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ठाकरे कुटुंबाच्या भेटीचा भावनिक क्षण उपस्थितांना पाहायला मिळाला. काका-पुतण्यांना जवळ आणण्यात सुप्रिया सुळेंनी पुढाकार घेतला. राज आणि उद्धव ठाकरेंचं भाषण संपल्यावर मंचावर काय झालं? जाणून घेऊया.
राज्य सरकारने प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ठाकरे बंधूंनी या निर्णयाविरोधात एकत्रितपणे आक्रमक भूमिका घेतली होती. सरकारने १६ एप्रिल आणि १७ जून हे दोन शासकीय आदेश मागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या स्वाभिमानाचा हा विजय 'मराठी विजय दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यात मराठी भाषा, संस्कृती आणि एकजुटीचा संदेश देण्यात आला.मेळाव्याच्या व्यासपीठावर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते, तर इतर मान्यवर पहिल्या रांगेत बसले होते. यावेळी प्रकाश रेड्डी, शेकापचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि शेवटी उद्धव ठाकरे यांनी भाषणे केली. राज ठाकरे यांनी आपल्या खणखणीत शैलीत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेत बाळासाहेब ठाकरे यांचा भावनिक किस्सा सांगितला, तर उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला एकजुटीचे आवाहन करताना भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
“आम्ही निवडणुकीसाठी नाही, तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत,” असे उद्धव यांनी ठणकावून सांगितले. मेळाव्यासाठी वरळी डोम परिसरात सकाळपासूनच तुफान गर्दी उसळली होती. नाशिक, ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आणि मराठीप्रेमी उपस्थित होते. मंचावर कोणत्याही पक्षाचे झेंडे नव्हते, फक्त महाराष्ट्राचा ध्वज लहरत होता, ज्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा अधोरेखित झाला. काही कार्यकर्त्यांनी “१९ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, आता भाजपाला धडा शिकवावा,” अशी भावना व्यक्त केली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर राज ठाकरे पुन्हा पोडीयमकडे आले आणि त्यांनी सभागृहात उपस्थित सर्व पक्षीय नेते आणि मान्यवरांना मंचावर आमंत्रित केले. यानंतर सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, प्रकाश रेड्डी, दीपक पवार हे मान्यवर मंचावर आले. त्यांनी एकत्र फोटो काढला. यानंतर सुप्रिया सुळे यांनी मंचाच्या डाव्या बाजुला उभ्या असलेल्या अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना हात धरुन एकत्र आणलं. आणि आदित्य ठाकरेंना राज ठाकरेंच्या बाजुला उभं केलं. दुसरीकडे अमित ठाकरे काका उद्धव ठाकरेंच्या बाजुला जाऊन उभे राहिले. पुढे महादेव जानकर यांनी मंचावर उपस्थित सर्वांना पेढा भरवला. मंचावरुन निघून जाताना आदित्य ठाकरे-अमित ठाकरे हे एकमेकांना भेटले. ठाकरे कुटुंब 19 वर्षानंतर एकत्र आलेले पाहायला मिळाले.
हा मेळावा केवळ मराठी अस्मितेचा उत्सव नसून, राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या दोन दशकांपासून शिवसेना आणि मनसे स्वतंत्रपणे कार्यरत असताना, या मेळाव्याने युतीच्या शक्यतांना बळ दिले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यापूर्वी कधीही राजकीय व्यासपीठावर एकत्र येण्याचा प्रयत्न केला नव्हता. मात्र, मराठीच्या मुद्द्याने त्यांना एकत्र आणले असून, येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.