Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी दीड वाजता हल्ला झाला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या पुण्यातील कुटुंब जखमी झालं आहे. दरम्यान काळ आला होता पण वेळ नाही या उक्तीला साजेसा प्रकार लालबागमधील एका कुटुंबाच्या बाबतीत घडलाय. ज्या ठिकाणी हल्ला झाला, ज्या दिवशी हल्ला झाला तेव्हाच पहेलगामला जाण्याचा प्लान साळुंखे परिवाराने आखला होता.
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील पाच जणांच कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेलं होतं. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. असावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे आणि संगीता गाबोटे अशी त्यांची ओळख पटली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पेहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मिरी पोषाख घालुन फोटो काढत होतं. त्यावेळी अचानक समोर दहशतवादी आले. दहशतवाद्यांनी या पर्यटकांना नावे विचारली. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असुन या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे. या कुटुंबासह पुण्यातील आणखी काही पर्यटक देखील या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना समोर आली होती.
अशा सर्व दु:खद आणि वेदनादायी घटना कानावर येत असताना एक सुखद वार्ताही समोर येतेय. दहशतवादी हल्ला झाला त्याच ठिकाणी लालबागला राहणारे कल्पेश साळुंखे हे आपल्या कुटुंबासह पिकनिकला जाणार होते. पण काही कारणांमुळे त्यांची फॅमिली पिकनिक रद्द झाली. मंगळवारी दुपारी दहशतवादी हल्ल्याची घटना त्यांच्या कानावर पडली. ती ऐकून कल्पेश यांना धक्काच बसला. कारण या काळात तेदेखील पहलगाम येथेच असणार होते.
आम्ही 10 दिवसाचा श्रीनगर दौरा प्लान केला होता. 21 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात आम्ही श्रीनगर, पहलगाम, गुलबर्ग, सोनबर्ग आणि कटरा या ठिकाणी जाणार होतो. काही वैद्यकीय कारणांमुळे आम्ही आमची पिकनिक रद्द केली होती, असे कल्पेश यांनी 'झी 24 तास'शी बोलताना सांगितले.
वैद्यकीय कारणामुळे आम्ही पिकनिक रद्द करुन प्लानिंग पुढे ढकललं. यामुळे लाखभर नुकसान तर झाले. पण सोन्याहून मौल्यवान जीव वाचला. यामुळे आम्ही देवाचे खूप आभार मानतो, असे कल्पेश साळुंखे सांगतात.