Thane ghodbunder Road Traffic: मुंबईसह महानगर प्रदेशात मेट्रोची कामे वेगात सुरू आहेत. शहरात अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहे. ठाण्यातील कासारवडवली भागातील मुंबई मेट्रो लाईन 4 चे एमएमआरडीएच्या माध्यमातून काम सुरू आहे. या मार्गिकेच्या उभारणीदरम्यान नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा दरम्याम दोन्ही वाहिन्यांवर 22 जून ते 14 जुलै या कालावधीत तुळई बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं या कालावधीत रात्री 11 ते पहाटे 4 या कालावधीत घोडबंदर रस्ता जड आणि अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर हलक्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
ठाणे शहरात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी घोडबंदर रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं या रस्त्यावर नेहमीच वाहनांची ये-जा अधिक होत असते. तसंच, अवजड वाहनांचीदेखील वाहतूक होत असते. अशावेळी अनेकदा वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. तसंच, आता एमएमआरडीएने मेट्रो 4 च्या कामासाठी या मार्गिकेवर तुळई बसवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळं ठाणे-घोडबंदर मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण करण्यात येणार आहे.
22 जून ते 14 जुलै या कालावधीत हे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं दररोज रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. मात्र यामध्ये पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर तसंच, अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना वगळण्यात आले आहे. तसंच, इतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे अवाहन ठाणे वाहतूक विभागाने केले आहे.
गायमुख मेट्रो स्टेशनजवळ तुळई उभारणीच्या कामासाठी ठाणे- घोडबंदर दिशेने जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना पुढे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून ते पिलर क्रमांक 85 जवळून विरुद्ध दिशेने वळतील आणि घोडबंदर-ठाणे मुख्य मार्गावरुन पुढे जाऊन पिलर क्रमांक 102 येथे डाव्या बाजूसवळून इंडियन ऑईल पंपसमोरुन मुख्य रस्ताने पुढे जातील. या कामाच्या दरम्यान हलकी वाहने पिलर क्रमांक 85 जवळून सेवा मार्गे इंडियन ऑईल पंपसमोर मुख्य रस्त्यार येऊन पुढे जातील.
घोडबंदर-ठाणे वाहिनीवर नागलाबंदर परिसरात तुळई बसवण्याचे काम सुरू असताना ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नागलाबंदर सिग्नल आशा वाईन शॉपजवळून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून नागलाबंदर येथील डिपी क्रमांक 72,73 व आशा वाईन शॉपजवळून सेवा मार्गाने लोढा स्प्लेन्ड्रा येथे घोडबंदर-ठाणे मुख्य रस्त्यावर येऊन पुढील प्रवास करता येईल.