Navi Mumbai Crime News : मुंबईतील नागपाड्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याच्या टाकी साफ करण्यासाठी गेलेल्या 5 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील नागपाडा परिसरातील बिस्मिल्लाह स्पेस बिल्डिंगमधील ही घटना आहे. कामगार पाण्याची टाकी साफ करत असताना त्यांना बेशुद्ध पडले. त्यानंतर या पाच कामगारांना लगेच जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता या पाचही कामगारांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली.
सुरुवातीला अग्निशमन दलाला आग लागल्याचा कॉल आला. मात्र तिथं आग लागली नसून पाण्याच्या टाकीत पाच मजूर पडल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले. दुर्घटनेचे कारण अस्पष्ट असले तरी सध्या दुर्घटनेचा तपास अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस करत आहेत. या घटनेमुळे त्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितली घटना
मुंबईतील नागपाडा परिसरातील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंगमध्ये पाण्याची टाकी साफ करण्यासाठी पाच कामगार गेले होते. टाकीमध्ये साफसफाई करत असताना ते बेशुद्ध पडले. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी अग्निशमन विभागाला फोन लावून माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना पाण्याच्या टाकीमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर लगेच त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलिसांनी सांगितले की, जेजे मार्ग पोलीस ठाण्यांतर्गत बिस्मिल्ला स्पेस नावाच्या बांधकामाधीन इमारतीत भूमिगत असलेल्या पाण्याच्या टाकीत हे पाच जण उतरले होते. प्राथमिक माहितीनुसार पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून पाचव्या व्यक्तीची प्रकृती ठीक असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नावे 19 वर्षीय हसीपाल शेख, 20 वर्षीय राजा शेख, 36 वर्षीय झियाउल्ला शेख आणि 38 वर्षीय इमांडू शेख अशी नावे आहेत. तर 31 वर्षीय पुरहान शेखची प्रकृती सध्या ठीक असल्याचं म्हटलं जात आहे.