Smoking In Dubai Mumbai Flight: विमानामध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई असते. विमानामध्ये कोणताही ज्वलनशील पदार्थ नेता येत नाही. मात्र मुंबईत असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. दोघांनी विमानाच्या स्वच्छतागृहात सिगारेट ओढण्याचा प्रयत्न केला. या दोन प्रवाशांविरोधात सहार पोलिसांनी विमान वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही पंजाबच्या अमृतसर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांपैकी एकाचं नाव कमलजीत सिंग असं असून तो 38 वर्षाचा आहे. तर कमलजीतबरोबर असलेल्या त्याच्या 30 वर्षीय सहकाऱ्याचं नाव कोमलजीत सिंग असं आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या दुबई ते मुंबई या विमानात हे दोघे 20 एप्रिल रोजी प्रवास करत होते. विमान सुरू होण्याआधी धूम्रपान बंदीची सूचना दिल्यानंतर एका प्रवाशाने 'फ्लाइट पर स्मोक कर सकते है क्या' अशी विचारणा केली. त्यावर असे करणाऱ्यावर कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले.
मुंबई विमानतळावर विमान पोहोचायला तासभर बाकी असताना टॉयलेटमधून सिगारेटच्या धुराचा वास येऊ लागला. केबिन क्रू मेंबर प्रवीणावल्ली मनोरंजन (35) यांनी टॉयलेटचा दरवाजा उघडला असता आत धूर भरला होता.
विमानाचे कप्तान जयकृष्ण नायर (51) यांच्यासमोर कमलजीत आणि कोमलजीत यांनी टॉयलेटमध्ये सिगारेट प्यायल्याची कबुली दिली. त्यानुसार विमानतळावर उतरताच या प्रवाशांकडून सिगारेटचे पाकीट ताब्यात घेण्यात आले. मात्र, लायटर किंवा माचिस त्यांच्याकडे सापडली नाही. त्यामुळे विमानातसोबत असलेल्या अन्य साथीदारांकडे ते दिले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सहार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला.
प्रवाशाने कबुली देताना, 'वहाँ पे लिखा था, यहाँ पे स्मोक अलाउड है इसलिये मैने स्मोक किया', असे स्पष्टीकरण दिले. त्याचदरम्यान दुसऱ्या प्रवाशानेही तेथे जाऊन धूम्रपान केले. त्याला जाब विचारल्यावर 'सॉरी फिरसे नहीं होगा' असे उत्तर देण्यात आल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. विमानामध्ये ज्वलनशील पदार्थांसंदर्भातील नियम मोडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई केली जाते. तशीच कारवाई आता या दोघांविरोधात केली जाणार असून मुंबईत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.