अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. स्कूल व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला असून यानंतर आता तरी खासगी अवैध स्कूल व्हॅन चालकांवर कारवाई होणार का? असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे.
अंबरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खासगी स्कूल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने जात होती. नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कूल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले. धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाच्या हा प्रकार लक्षातही आला नाही आणि तो तिथून निघून गेला. मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली.
यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हे विद्यार्थी पडले. त्यावेळेस मागून जर एखादा ट्रक येत असता, तर विद्यार्थी जीवानिशी गेले असते. खासगी स्कूल व्हॅनच्या डिक्कीत अक्षरशः २०-२० मुलांना कोंबून त्यांची अवैधरित्या वाहतूक केली जाते, त्यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, आता तरी या अवैधरित्या स्कूल व्हॅन चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांवर कारवाई होते? की आरटीओ आणि वाहतूक पोलीस त्यांना चिरीमिरी घेऊन सोडून देतात? हे पाहावं लागणार असून यानंतर पालकांमधून मात्र संताप व्यक्त होत आहे.