Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'मोदी रडू लागले की, देशात...', फडणवीसांनी राज-उद्धव मेळाव्याला 'रुदाली' म्हटल्याने ठाकरेंच्या सेनेनं सगळच काढलं

Uddhav Shivsena On PM Modi Crying: "फडणवीसांना मोदी वगैरेंच्या सभेला टाळ्या वाजविण्यासाठी भाड्याने माणसे आणणे त्यांना परवडू शकते," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

'मोदी रडू लागले की, देशात...', फडणवीसांनी राज-उद्धव मेळाव्याला 'रुदाली' म्हटल्याने ठाकरेंच्या सेनेनं सगळच काढलं

Uddhav Shivsena On PM Modi Crying: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला 'रुदाली' म्हटल्याने उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच संतापली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना फडणवीसांनाही सुनावलं आहे. फडणवीस यांनी ‘मराठी’ विजयाचा जल्लोष करणाऱ्या मराठी अस्मितेला मृत्यूसमयी पैसे घेऊन रडणाऱ्या बायकांची उपमा द्यावी यासारखी राज्याची शोकांतिका नाही, असं म्हणत 'सामना'च्या अग्रलेखातून मोदींच्या रडण्याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे.

हीच मराठी भाषेची परंपरा

"मराठी भाषा, मराठी साहित्याची नि कलेची परंपराच अशी तेजस्वी आहे की, महाराष्ट्र सरस्वतीच्या दरबारातील वीणा झंकाराला अन्यायाशी लढणाऱ्या शाहीराच्या डफाची सदैव साथ मिळाली आहे. आजचा मराठी माणूस याच तेजस्वी आणि स्वाभिमानी परंपरेचा खरा वारसदार आहे. एकीकडे भागवत ग्रंथ लिहून भक्ती सुमनांचा वर्षाव करीत असतानाच दुसरीकडे रामायण लिहून मोगल परचक्राशी लढण्याची वीरश्री गुप्तपणे महाराष्ट्रात जागवणाऱ्या एकनाथ महाराजांची परंपरा मराठी भाषा आणि साहित्याची आहे. मराठी भाषेसाठी आणि मराठी जनतेसाठी वाटेल तो छळ सोसून पुन्हा लढण्यासाठी सज्ज होणाऱ्या ज्ञानेश्वर, तुकाराम, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजांची परंपरा हीच मराठी भाषेची परंपरा आहे," अशी आठवण ठाकरेंच्या सेनेनं अग्रलेखातून करुन दिली आहे.

मोदी वगैरेंच्या सभेला टाळ्या वाजविण्यासाठी भाड्याने माणसे आणणे फडणवीसांना...

"राजस्थान, हरयाणा, बुंदेलखंड, मध्य प्रदेश वगैरे भागांत ‘रुदाली’ हा प्रकार आहे. एखाद्याच्या घरी मृत्यू वगैरे काही दुःखद प्रसंग घडला असेल तर तेथे भाड्याने म्हणजे पैसे मोजून रडण्यासाठी, छाती पिटून आक्रोश करण्यासाठी (श्रीमंतांच्या घरी) बायका बोलावल्या जातात. रोख पैसा घेऊन त्या रडतात व निघून जातात. फडणवीस यांनी ‘मराठी’ विजयाचा जल्लोष करणाऱ्या मराठी अस्मितेला मृत्यूसमयी पैसे घेऊन रडणाऱ्या बायकांची उपमा द्यावी यासारखी राज्याची शोकांतिका नाही. फडणवीस व त्यांच्या पक्षाकडे प्रचंड धनसंपत्ती आहे. हा लुटीचा माल आहे. त्यामुळे रडण्यासाठी, हसण्यासाठी, मोदी वगैरेंच्या सभेला टाळ्या वाजविण्यासाठी भाड्याने माणसे आणणे त्यांना परवडू शकते. अस्सल स्वाभिमानी मराठी माणूस या स्वाभिमान विक्रीच्या भानगडीत पडत नाही. तो मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी इतिहास व त्यातील मर्दानी बाण्यावर मनापासून प्रेम करतो," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलंय.

गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांची ‘रुदाली’

"इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध आपल्या प्रतिभेची नंगी समशेर पाजळणाऱ्या कवी गोविंदांची, ‘केसरी’कार टिळकांची, कवी विनायकांची, स्वातंत्र्यवीर सावरकरांची, शिवराम महादेव परांजपे यांची, काकासाहेब खाडिलकरांची, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, आचार्य अत्रे, व्यंगचित्रकारीतून महाराष्ट्राच्या दुश्मनांना घायाळ करणाऱ्या आणि मराठी जनांवरील अन्यायाविरोधात ‘शिवसेना’ स्थापन करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. या परंपरेत भाजप व त्यांचे बगलबच्चे कोठेच बसत नसल्याने ते महाराष्ट्राच्या मर्दानगीस ‘रुदाली’ म्हणून हिणवत आहेत. देशात गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांची ‘रुदाली’ सुरू आहे. इतकी मोठी सत्ता हाती मिळूनही आजही पंडित नेहरू, गांधी कुटुंबाच्या नावाने खडे फोडायचे व स्वतःचे अपयश झाकण्यासाठी रडायचे यासारखी दुसरी ‘रुदाली’ नसेल," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.

मोदी रडू लागले की...

"मोदी रडू लागले की, देशात इतरांचे रडगाणे सुरू होते व देशात दुःखाचा माहौल निर्माण होतो. भारतासारख्या महान देशाच्या मर्द गर्जनेची यांनी ‘रुदाली’ केली. त्यामुळे मुंबईतला मराठी मर्दांचा उसळलेला सागर देवेंद्र फडणवीस यांना ‘रुदाली’ वाटत असेल तर त्यांनी स्वतःची ‘रुदाली’ सुरूच ठेवावी! फडणवीसांची ‘रुदाली’ म्हणजे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा आवाज नाही!" असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे. 

 

Read More