Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'दिल्लीत तुम्ही महाराष्ट्राची लाज घालवली', शिंदेच्या सेनेचा ठाकरेंवर घणाघात; 'बाळासाहेबांनी आम्हाला..'

Eknath Shinde Shivsena Slams Uddhav Thackeray Shivsena: दिल्लीमध्ये गुरुवारी घडलेल्या एका प्रकारावरुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये टीका केलीये.

'दिल्लीत तुम्ही महाराष्ट्राची लाज घालवली', शिंदेच्या सेनेचा ठाकरेंवर घणाघात; 'बाळासाहेबांनी आम्हाला..'

Eknath Shinde Shivsena Slams Uddhav Thackeray Shivsena: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी गुरुवारी दिल्लीतील निवासस्थानी 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केलेली.  बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंना सहाव्या रांगेत बसवल्याचं दिसून आलं. यावरुनच आता विरोधकांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या बैठकीतील फोटो समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत बसवण्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता या विषयावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ठाकरेंनी दिल्लीत महाराष्ट्राची लाज काढली अशी कठोर टीका या बैठकीतील फोटो शेअर करत करण्यात आली आहे.

तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे?

ठाणे लोकसभा मतदारसंघांचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच महाराष्ट्र प्रदेश समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्केंनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे... शिवरायांचा वारसा सांगता ना रे... खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे?" असं पोस्टच्या पहिल्या ओळीत म्हस्केंनी म्हटलं आहे. "बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे?" असा खोचक सवालही म्हस्केंनी उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> राहुल गांधींच्या घरातील 'तो' फोटो BJP ने केला शेअर! कारण ठरले ठाकरे; भाजपा म्हणते, 'या फोटोत...'

तुम्ही पार लाज घालवलीत रे

 "काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे... तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे, त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे! महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे," असा खोचक टोमणा म्हस्केंनी लगावला आहे. "थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा  ना रे, महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे," असं म्हणत म्हस्केंनी टीका केली आहे.

FAQ

1. इंडिया आघाडीच्या बैठकीत काय घडले?
8 ऑगस्ट 2025 रोजी दिल्लीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आले होते. यावरून विरोधकांनी, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने, उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

2. उद्धव ठाकरेंच्या बैठकीतील स्थानावर कोणी टीका केली?
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तसेच प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी एक्स पोस्टद्वारे ठाकरेंना सहाव्या रांगेत बसवण्यावरून "महाराष्ट्राची लाज घालवली" असा टोमणा मारला.

3. या बैठकीचे महत्त्व काय होते?
ही बैठक इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमधील समन्वय आणि रणनीती ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा निवडणुकीतील कथित अनियमितता, आणि हिंदी भाषा थोपवण्याचा मुद्दा यावर चर्चा होण्याची शक्यता होती. राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना विशेष निमंत्रण दिले होते, आणि ही लोकसभा निवडणुकीनंतरची आघाडीची पहिली व्यक्तिगत बैठक होती.

4. या प्रकरणावर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाची प्रतिक्रिया काय आहे?
सध्या उपलब्ध माहितीनुसार, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाने नरेश म्हस्के यांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिलेले नाही. तथापि, उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीच्या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला आणि महाराष्ट्रातील राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.

5. या घटनेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
या घटनेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो. शिंदे गटाने ठाकरेंच्या स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेत आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही गटांमधील स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.

Read More