Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'Thank You ट्रम्प!' 182 कोटींचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेनं मानले आभार; म्हणाले, 'महाराष्ट्रातील आमदार...'

Uddhav Thackeray Shivsena Says Thank You Donald Trump: "भाजप ‘व्होटिंग टर्नआऊट’ वाढावा यासाठी अशा बाबा, बुवा, महाराजांची भक्कम मदत घेत असतो."

'Thank You ट्रम्प!' 182 कोटींचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेनं मानले आभार; म्हणाले, 'महाराष्ट्रातील आमदार...'

Uddhav Thackeray Shivsena Says Thank You Donald Trump: "डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या सरकारने पंतप्रधान मोदी यांची कोंडी केली आहे. त्यामुळेच मोदी हे मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या मठात पोहोचले. हा मठ सगळ्याच बाबतीत वादग्रस्त आहे. भाजप ‘व्होटिंग टर्नआऊट’ वाढावा यासाठी अशा बाबा, बुवा, महाराजांची भक्कम मदत घेत असतो. त्यात बलात्कार, खून वगैरेंच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बाबा रामरहीमचादेखील समावेश आहे. आसाराम बापू सध्या जामिनावर सुटले. एखाद्या निवडणुकीत ‘व्होटिंग टर्नआऊट’ वाढविण्यासाठी भाजप त्यांचीही मदत घेईल. काही कमी पडलेच तर महाकुंभात गाजलेले आयआयटीवाले बाबा आहेतच. मूळ प्रश्न अमेरिकन प्रेसिडंट ट्रम्प यांचे प्रिय मित्र पंतप्रधान मोदी यांना ‘व्होटिंग टर्नआऊट’ म्हणजे मतदान वाढावे यासाठी 21 मिलियन डॉलर्स (182 कोटी रुपये) दिले गेले त्याचा आहे. हे सर्व पैसे मोदी व त्यांच्या पक्षाने अमेरिकेकडून स्वीकारले, पण नक्की कोणत्या प्रकल्पात वापरले ते कळत नाही. भारतीय निवडणुका जिंकण्यासाठी मोदी यांनी परकीय पैसा वापरला, असे स्वतः प्रेसिडंट ट्रम्प सांगत आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

...म्हणून निवडणुकीत थेट ‘डॉलर्स’ला घुसवले

"अमेरिकेने भारतातील निवडणुकांत मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी हा पैसा दिला, पण भाजपने पैसा स्वतःच्याच फायद्यासाठी वापरला. भाजपने स्वतःची मते वाढावीत यासाठी धर्म, बाबा लोक, मतदार यादीतील घोटाळे यांचा उपयोग करून घेतला आणि मतदारांना पैसे वाटण्याचे काम केले. त्यासाठी हे अमेरिकेचे ‘पैसे’ वापरले. हरयाणात सहा लाख मते वाढली. त्यामुळे काँग्रेस हरली. महाराष्ट्रात लोकसभा ते विधानसभा या पाच महिन्यांत साधारण 40 लाख मते रहस्यमयरीत्या वाढली व महाविकास आघाडीचा पराभव झाला. ही चाळीस लाख मते भाजपलाच पडावीत यासाठी अमेरिकन डॉलर्सचा उपयोग झाला. पैशांनी नव्हे, तर डॉलर्सने मते विकत घेतली. रुपयाचे अवमूल्यन डॉलर्सच्या तुलनेत झाले म्हणून निवडणुकीत थेट ‘डॉलर्स’ला घुसवले व निवडणुका जिंकल्या," असा आरोप 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

हे भारताने सहन करायचे काय?

"निवडणुकीत झालेला हा भ्रष्टाचार आहे. प्रेसिडंट ट्रम्प यांनी सरळ सांगितले की, ‘‘21 मिलियन डॉलर्स प्रिय मित्र मोदींना दिले.’’ यावर मोदी व त्यांचे अंधभक्त काहीच बोलायला तयार नाहीत. डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी सांगितले की, ‘‘पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणात निवेदन जारी करावे. ट्रम्प यांना मानहानीची नोटीस पाठवावी.’’ डॉ. स्वामी यांचे म्हणणे खरेच आहे. अमेरिकेचे प्रेसिडंट ट्रम्प यांनी मोदींवर ‘लेन-देन’चा ठपका ठेवला आहे, हे भारताने सहन करायचे काय? भारतात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अमेरिकेची आर्थिक मदत का लागावी व या मदतीने फक्त भाजपचीच मते कशी वाढतात? याचा खुलासा भारताचा निवडणूक आयोग, गृहमंत्री वगैरेंनी केलाच पाहिजे," अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.

नक्की वाचा >> 'मी पैजेवर सांगते की जे लोक...'; मोदींचा उल्लेख करत मेलोनी अगदी स्पष्टच बोलल्या

...तर त्या देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता

"प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारताला पैसे दिल्याचा उच्चार पुनः पुन्हा केला आहे. त्यांनी सवाल केला आहे की, ‘‘भारताला त्यांच्या निवडणुकांसाठी 21 मिलियन डॉलर्स दिले जात आहेत ते का म्हणून? आपण निवडणुकांसाठी भारताला पैसे देत आहोत. त्यांना पैशांची गरज नाही.’’ प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारताला ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्याचा सल्ला दिला आहे व त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढू शकेल असे ट्रम्प, मस्क वगैरे मंडळींचे म्हणणे आहे. भाजप या कामासाठी पैसे घेतो व मतदारांना विकत घेण्यासाठी पैसे वापरतो हे आता चव्हाट्यावर आले. दुसऱ्या एखाद्या देशात हे असे प्रकरण चव्हाट्यावर आले असते तर त्या देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता. परकीय पैशांचा वापर करून निवडून आलेले सरकारही लोकांनी घरी बसवले असते, पण भारतातील लोकशाही बागेश्वर बाबांच्या मठात जाऊन चिंतन करीत आहे," असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.

भाजपचा मुखवटा ओरबाडून काढणारा हा...

"मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘बाबा’ लोकांना भाजप प्रचाराचे कार्य दिले व त्यासाठी अमेरिकेचा पैसा वापरला. मतदानाचा हक्क बजावावा असे सांगणारी जाहिरातबाजी झाली. म्हणजे यासाठी अमेरिकेचा पैसा कामी आला. भारताची लोकशाही वाचविण्यासाठी मोदी हे प्रेसिडंट ट्रम्प यांचा पैसा वापरीत आहेत. अमेरिकेने त्यांच्या देशातील बेकायदा भारतीयांना बेड्यांत जखडून पाठवले व पंतप्रधान मोदींनी त्याचा निषेध केला नाही याचे रहस्य अमेरिकेने भारतातील मतदान वाढविण्यासाठी दिलेल्या 21 मिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये आहे. भाजपचा मुखवटा ओरबाडून काढणारा हा सर्व प्रकार आहे," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील आमदार, खासदार विकत घेण्यासाठीही...

"अमेरिकेतून आलेला पैसा नक्की कोठे गेला? या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली संयुक्त संसदीय समितीची स्थापना व्हायला हवी. लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र, हरयाणाच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी परकीय पैशांचा मुक्त वापर झाला. भारतात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी परकीय निधी आला. भाजपने हा निधी स्वतःसाठी मतदार खरेदी करता यावेत यासाठी वापरला. भारतीय लोकशाहीला काळिमा फासणारे हे कृत्य आहे. महाराष्ट्रातील आमदार, खासदार विकत घेण्यासाठीही हाच पैसा वापरला असेल, काय सांगावे? प्रेसिडंट ट्रम्प यांनी मजेत व गमतीत सत्य सांगितले. प्रेसिडंट ट्रम्प, थँक यू," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Read More