Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Mumbra Accident: रेल्वेमंत्र्यांच्या 'त्या' विधानावरुन वाद; ठाकरेंची सेना म्हणते, 'आणखी किती मृत्यू व्हायला हवे होते, म्हणजे तुम्हाला..'

Railway Minister Ashwini Vaishnav On Mumbai Train Accident: "मुंबईत रोज किमान सात-आठ उपनगरी प्रवाशांचा मृत्यू प्रवासादरम्यान होत असतो. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास हा ‘मौत का कुवा’ बनला आहे."

Mumbra Accident: रेल्वेमंत्र्यांच्या 'त्या' विधानावरुन वाद; ठाकरेंची सेना म्हणते, 'आणखी किती मृत्यू व्हायला हवे होते, म्हणजे तुम्हाला..'

Ashwini Vaishnav On Mumbai Train Accident: "मुंब्रा येथे सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेने लोकल प्रवाशांचे जीवन कसे क्षणभंगुर आहे आणि त्याबाबत रेल्वे मंत्रालय किती बेपर्वा आहे हे पुन्हा एकदा उघड झाले. मुंब्रा स्थानकाजवळ ज्या ‘धोक्याच्या वळणा’वर ही दुर्घटना घडली, त्या वळणाबाबत प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी वारंवार इशारे दिले आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाचे कानाचे पडदे त्यामुळे थरथरले नाहीत. रेल्वेचा हा ढिम्म कारभारच सोमवारी चार निरपराध प्रवाशांच्या जिवावर बेतला," असा घणाघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

चार प्रवाशांचे जीव गेल्यावर रेल्वेला जाग

"जलद लोकलच्या मार्गिकेवर असलेले हे तीव्र वळण अत्यंत धोकादायक आहे. जलद लोकल तेथून मार्गक्रमण करीत असताना दोन्ही बाजूंना जोरात हेलकावे खात असते. त्यामुळे दरवाजात लटकलेल्या प्रवाशांचा जीव ते काही क्षण अक्षरशः टांगणीला लागलेला असतो. जिवाच्या आकांताने खांब पकडून ठेवणे आणि एकमेकांना आधार देत तोल सांभाळणे एवढेच त्यांच्या हातात असते. हा काही क्षणांचा प्रवास जीवघेणा ठरू शकतो याची जाणीव प्रवाशांना असली तरी त्याची फिकीर रेल्वे प्रशासनाला नव्हती. आता सोमवारी त्याच ठिकाणी चार प्रवाशांचे जीव गेल्यावर रेल्वेला जाग आली आहे. मात्र त्यामुळे त्या चौघांचे जीव परत येणार आहेत का? त्यांची उद्ध्वस्त कुटुंबे सावरली जाणार आहेत का?" असा सवाल 'सामना'मधून विचारण्यात आला आहे.

लोकल प्रवास हा ‘मौत का कुवा’

"लोकल प्रवाशांना वाऱ्यावर सोडायचे आणि नियंत्रणाबाहेर गेलेल्या गर्दीच्या नावाने बोंब मारत हात झटकायचे, हेच धोरण रेल्वे प्रशासनाचे राहिले आहे. मुंबईतील लोकल प्रवासी संख्या प्रचंड वाढली आहे आणि त्याचा लोकल सेवेवर असह्य ताण पडला आहे, रेल्वेला तांत्रिक आणि इतर मर्यादा आहेत या सगळ्या गोष्टी मान्य केल्या तरी रेल्वेने प्रवाशांना वाऱ्यावर सोडायचे, ‘‘तुमचे जीव तुम्हीच सांभाळा’’ असे सांगत आपली जबाबदारी टाळायची असा त्याचा अर्थ होत नाही. एकीकडे लोकल सेवा ही ‘मुंबईची लाइफलाइन’ वगैरे असल्याचे छाती फुगवून सांगायचे आणि दुसरीकडे या उपनगरी रेल्वे सेवेचा मृत्युदर 38.08 टक्के एवढा का आहे? या भयंकर वास्तवाकडे डोळेझाक करायची. गेल्या वीस वर्षांत उपनगरी प्रवासादरम्यान झालेले तब्बल 51 हजार 802 प्रवाशांचे मृत्यू रेल्वेच्या बेपर्वा धोरणाचे बळी आहेत. ठाणे-कसारा आणि बदलापूर या मार्गावर मागील फक्त 15 महिन्यांत 663 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यातील बहुतेक मृत्यू गाडीतून पडल्याने झाले आहेत. मुंबईत रोज किमान सात-आठ उपनगरी प्रवाशांचा मृत्यू प्रवासादरम्यान होत असतो. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास हा ‘मौत का कुवा’ बनला आहे," अशा शब्दांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं रेल्वे प्रशासनाला फटकारलं आहे.

...तर अश्विनी वैष्णव यांच्या हातात रेल्वे प्रवाशांचे जीव सुरक्षित आहेत, असे कसे म्हणता येईल?

"मुंबईतील उपनगरी प्रवाशांची वाढलेली संख्या, ‘एसी’ लोकलची सुविधा यावरून टिमक्या वाजविणाऱ्या रेल्वे मंत्रालयातील ‘रावसाहेबां’ना आणि ‘रील मंत्र्यां’ना या भीषण वास्तवाची जाणीव तरी आहे का? जाणीव सोडा, मुंब्रा येथे सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेबाबत साधी सहवेदना व्यक्त करण्याचे सौजन्यही रेल्वेमंत्र्यांनी दाखवू नये? ‘‘रेल्वे मंत्रालयाने पत्रक काढले आहे. या मुद्द्यावर जास्त बोलण्याची गरज नाही,’’ असे बेपर्वा उद्गार जर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेच काढणार असतील तर त्यांच्या हातात रेल्वे प्रवाशांचे जीव सुरक्षित आहेत, असे कसे म्हणता येईल?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

हे पाप रेल्वेचेच

"वैष्णवसाहेब, मुंब्रा येथील दुर्घटनेत आणखी किती निरपराध्यांचे मृत्यू व्हायला हवे होते, म्हणजे तुम्हाला ‘बोलण्याची गरज’ वाटली असती? ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड परायी जाणे रे’ हे गांधीजींचे अत्यंत आवडते भजन होते. ‘जो दुसऱ्याची पीडा समजतो, जाणतो तोच खरा वैष्णव’ असा या ओळीचा अर्थ. सध्या रेल्वे खात्याची धुरा ज्या ‘वैष्णवां’कडे आहे त्यांना ना मुंबईकर उपनगरी रेल्वे प्रवाशांची पीडा, त्रास याची जाणीव आहे ना मुंब्रा दुर्घटनेतील दुर्दैवी मृत्यूंबद्दल सहवेदना व्यक्त करण्याचे सौजन्य. त्यांनी कितीही हात झटकले तरी कमालीचा असुरक्षित झालेला मुंबईतील लोकल प्रवास आणि मुंब्रा दुर्घटनेतील बळी हे पाप रेल्वेचेच आहे. त्याचे प्रायश्चित्त तुम्हाला घ्यावेच लागेल," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Read More