Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. जून महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पश्चिमेकडून जाण्यासाठी एक नवीन रस्ता जोडण्यात येणार आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे (वेस्टर्न एन्ट्री इंटरचेंज) काम जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न एन्ट्री इंटरचेंजमुळं आम्र मार्ग आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळं प्रवाशांनाही आरामत टर्मिनलपर्यंत पोहोचता येणार आहे.
सिडको महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या इंटरजेंचचे काम सुरू आहे. अटल सेतू ते विमानतळादरम्यान कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी उलवे किनारी मार्ग नियोजित आहे. आम्र मार्ग आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत चालावी याकरता विमानतळ पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदल हा उलवे किनारी मार्गाच्या 1.2 किमीच्या उन्नत विमानजळ जोड रस्त्याला जोडला आहे. या मार्गावर दोन लूप आणि दोन रॅम्प यांचा समावेश आहे. आम्र मार्गावरुन विमानतळाच्या दक्षिण बाजूस जाणाऱ्या वाहतुकीकरिता लूप ए व आम्र मार्गावरुन उत्तर बाजूस जाणाऱ्या वाहतुकीकरिता रॅम्प एचा वापर करता येणार आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्ग प्रकल्पाअंतर्गंत एक अतिरिक्त वाहन मार्ग आणि उलवे नदी प्रवाहावरील लहान पूल यांचा समावेश आहे. पुढील महिन्यात हा मार्ग वाहतुकीकरिता खुला होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळं संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातून विमानतळाकडे येणारी वाहतूक सुरळीत होणार आहे.
‘एनएचएआय’तर्फे या अंतर्गत आम्रमार्ग, राज्य महामार्ग-54 व राष्ट्रीय महामार्ग-4बी यांच्या विस्तारिकरणाकरिता निधी संकलन आणि अंमलबजावणीसाठी ‘मुंबई-जेएनपीटी पोर्ट रोड कंपनी लि.’ (एमजेपीआरसीएल) या विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ‘एमजेपीआरसीएल’मध्ये ‘एनएचएआय’, ‘जेएनपीटी’ आणि ‘सिडको’ यांची अनुक्रमे 67.04 टक्के, 26.91 टक्के आणि 6.05 टक्के इतकी भागीदारी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी या महामार्गाचे विस्तारीकरण ही महत्त्वाचे ठरणार आहे.