Ganeshotsav News: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र सध्या गणेशभक्त एका वेगळाच पेचात पडले आहेत. सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या
गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरी शाडूच्या मूर्तीचेही समुद्रातच विसर्जन करायचे की कृत्रिम तलावांत, असा पेच अनेकांना पडला आहे.
शाडूच्या मूर्ती आणि सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जनही कृत्रिम तलावात करावयाचे झाल्यास तेथे विसर्जनासाठी मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र, नैसर्गिक स्रोतात विसर्जन करण्यास मनाई केली होती. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने न्यायालयापुढे बाजू मांडल्यानंतर सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यास न्यायालयाने परवानगी दिली. त्याचवेळेस त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, असेही स्पष्ट केले होते.
सहा फुटांपर्यंतच्या मूर्तीचे कृत्रिम तलावांत विसर्जन करावयाचे झाल्यास पालिकेला कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ करावी लागेल. शाडूच्या मूर्तीचे विसर्जन कुठे करायचे, हा प्रश्न कायम. या मूर्ती कृत्रिम तलावांत विसर्जित केल्या तर त्या मातीचा पुनर्वापर करता येईल. समुद्रातून माती कशी काढणार? दोन्ही प्रकारच्या मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन झाल्यास गर्दी होऊ शकते, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, शाडूच्या मूर्ती समुद्र किंवा अन्य नैसर्गिक स्रोतात विसर्जन करण्यास परवानगी दिली तर कृत्रिम तलावांच्या ठिकाणची गर्दी नियंत्रणात राहू शकते.
माघी गणेशोत्सवात रखडलेले चारकोपच्या राजाचे विसर्जन आज म्हणूजेच 2 ऑगस्टला होणार आहे. पश्चिम उपनगरातील चारकोपचा राजा आणि कांदिवलीच्या श्री मंडळाचा समावेश आहे. सुरुवातीला कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जन करणार नाही अशी भुमिका मंडळांनी घेतली होती. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर समुद्रात आता या गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.