Jalna Crime News : जालना शहरात विक्रीसाठी आणलेले खवले मांजर आणि तीन महागडी वाहने जालना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. बनावट ग्राहक तयार करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकारामुळे खवल्या मांजराची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. खवले मांजर विक्रीसाठी वाशिम जिल्हयातील एक व्यक्ती जालना शहरात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ही व्यक्ती जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात आली होती.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून खवले मांजर खरेदी करण्यासाठी बनावट ग्राहक तयार ठेवले होते. या व्यक्तीने बनावट ग्राहकांना चारचाकी वाहनात ठेवलेले खवले मांजर दाखविले आणि त्याच वेळी वनविभागाच्या पथकाने छापा मारून खवले मांजर ताब्यात घेतलं. दरम्यान वन विभागाने या प्रकरणात 6 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून तीन वाहनांसह खवले मांजर जप्त करण्यात आलं आहे.
वन विभागाने सापळा रचून केली कारवाई
या प्रकरणी आरोपी संजय राठोड, सुनिल थोरात, नारायण अवचार, प्रताप गुलाबराव सरनाईक आणि अनिल सादळे ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना जालना वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात चौकशी आणलं आहे. त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र तपासून खात्री केली जात आहे. या प्रकरण आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 40 (2), 48 A, 49 B, 50 (1)(C), 51 कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात वापरण्यात आलेली तिन्ही वाहनांवर आणि आरोपींचे फोन वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 50 (1) (C) अंतर्गत जप्त करण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणी अधिक तपास वनविभागाचे अधिकारी करत आहेत.
खवले मांजर हा एक अतिशय दुर्मिळ प्राणी आहे. त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. या प्राण्यांना वन्यजीव अधिवासातून पकडून तस्कर देश-विदेशात मोठ्या किंमतीमध्ये विकून प्राण्याची विक्री करतात. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी नागरगोजे आणि दौंड यांनी सापळा रचून तब्बल सहा आरोपी आणि तीन वाहनांना ताब्यात घेतले आहे.