Scuba Diving In India: भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर विविध ठिकाणी स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घेता येतो. ज्यामुळे आपल्याला निसर्गाच्या या वेगळ्या जगात फिरता येऊ शकते. वाळूच्या किनाऱ्यांपासून ते रंगीबेरंगी प्रवाळ खडकांपर्यंत, भारतीय समुद्रांच्या खोलात अनेक सागरी जीवांची वस्ती आहे. विविध ठिकाणी स्कूबा डायव्हिंग करून तुम्ही या सुंदर सागरी जीवनाचा अनुभव घेऊ शकता. पाहूयात भारतातील सर्वोत्तम स्कूबा डायव्हिंग डेस्टिनेशन्स कोणते आहेत.
अंदमान आणि निकोबार हे भारतातील एक स्कूबा डायव्हिंग डेस्टिनेशन आहे. येथील हॅवलॉक आणि नील बेटे लोकप्रिय आहेत. जिथे स्कूबा डायव्हिंग करताना तुम्हाला प्रवाळ खडक, रंगीबेरंगी मासे, समुद्रातील जीव आणि अनेक दृश्ये अनुभवता येतात. 4,000 ते 5,000 रुपयांमध्ये तुम्ही येथे स्कूबा डायव्हिंग करू शकता. अंदमानच्या या ठिकाणी जाऊन तुम्हाला सागरी जीवनाची नक्कीच ओळख होईल.
लक्षद्वीपचे निळेशार पाणी आणि तेथील विविध सागरी जीव पाहण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथे तुम्ही 'प्रिन्सेस रॉयल', 'लॉस्ट पॅराडाइझ', 'डॉल्फिन रीफ' आणि इतर ठिकाणी स्कूबा डायव्हिंग करू शकता. इथे समुद्राच्या खोलात शार्क, मेंटास, कासवे आणि अनेक रंगीबेरंगी मासे पाहता येतात. 4000 ते 7000 रुपयांमध्ये तुम्हाला हे अद्भुत जग पाहायला मिळू शकते.
गोवा केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठीच प्रसिद्ध नाही. तर येथे स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घेणंही अविस्मरणीय ठरू शकतं. गोव्यातील सुझीज रेक, सेल रॉक, डेव्ही जोन्स लॉकर, शेल्टर कोव्ह आणि टर्बो टनेल ही प्रसिद्ध डायव्हिंगसाठीचे ठिकाणे आहेत. येथील जलचरांचे जीवन आणि प्रवाळ खडकांचा देखावा तुम्हाला 5000 रुपयांपेक्षा मिळवता येईल. ओक्टोबर ते मे महिन्यात या ठिकाणी स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेता येतो.
कर्नाटकमध्ये नेत्राणी बेटावर स्कूबा डायव्हिंगचा अनुभव खूप लोकप्रिय आहे. इथे तुम्ही समुद्रातील कासवे, व्हेल, शार्क्स, विविध रंगीबेरंगी मासे आणि इतर सागरी जीव पाहू शकता. कर्नाटकमधील नेत्राणी बेटावर डायव्हिंगचा अनुभव साधारणपणे 5000-6000 रुपयांमध्ये घेतला जाऊ शकतो.
पाँडिचेरीमध्ये स्कूबा डायव्हिंग वर्षभर उपलब्ध असतो. येथील 'कूल शार्क रीफ', 'अरविंद वॉल', 'टेम्पल रीफ' आणि इतर डायव्हिंग ठिकाणी स्कूबा डायव्हिंग केल्याने तुम्हाला समुद्रातील अद्भुत जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. पाँडिचेरीचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि शांत आहे. ज्यामुळे डायव्हिंग करणाऱ्यांना इथले दृश्ये अधिक आकर्षक आणि अविस्मरणीय वाटतात. इथे तुम्हाला साधारणपणे 6000 ते 8000 रुपयांमध्ये स्कूबा डायव्हिंगचा अनुभव मिळतो.
केरळच्या कोवलम बीचवरील स्कूबा डायव्हिंग हे एक लोकप्रिय ठिकाण बनत आहे. कोवलम येथे समुद्राच्या स्वच्छ पाण्यात विविध प्रकारच्या सागरी जीवांना पाहाता येऊ शकते. रंगीबेरंगी प्रवाळ खडक आणि जलचरांच्या विविधतेमुळे इथला स्कूबा डायव्हिंग अनुभव खूप खास ठरतो. यासाठी तुम्हाला कमीतकमी 3500 ते 4500 रुपयांपर्यंत खर्च येतो.
भारतामधील स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही एकदातरी या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकतात. इथे असलेल्या प्रत्येक डायव्हिंग ठिकाणी तुम्हाला रंगीबेरंगी सागरी जीव, प्रवाळ खडक आणि जलचरांची विविधता अनुभवता येते. यातील कोणतेही ठिकाण असो, स्कूबा डायव्हिंगचा अनुभव नक्कीचं तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.