Juve Island Ratnagiri: महाराष्ट्रातील कोकणात निसर्गाच्या कुशीत बसेलेल्या या गावाचे जीवन अजूनही खूप साधे आहे. हे गाव चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे आणि इथे जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. इथे घराबाहेर गाड्याऐवजी होड्या पार्क केलेल्या असतात. कारण या गावात प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग आहे - समुद्रातून होडी किंवा बोट वापरून.
हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. या गावात 111 घरं असलेली एक स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. या गावात प्रवेश करण्यासाठी रत्नागिरीहून राजापूर, मग जैतापूरपर्यंत बसने जावे लागते आणि तेथून होडी किंवा बोटीतून या गावात पोहचता येते.
या गावात पर्यटनाचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला नाही. ज्यामुळे हे स्थान पर्यटकांपासून जरा अलिप्तचं राहिले आहे. या गावाचे निसर्गसौंदर्य काही औरच आहे. नारळी-पोफळीच्या बागा आणि निळ्या पाण्याने वेढलेला किनारा या गावाचे प्रमुख आकर्षण आहे. राजापूरच्या अर्जुना नदीच्या वळणावर वसलेले हे गाव असं एक ठिकाण आहे जिथे समुद्री वाऱ्याच्या गंधासोबत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकता येतो.
या गावात काही गोष्टी जरा वेगळ्या आहेत. इथे असलेल्या लोकांचे जीवन अत्यंत साधे आणि शांत आहे. त्यांना बाहेरच्या जगाशी जोडणारा मुख्य संपर्क म्हणजे समुद्र. या गावातील लोक मुख्यतः मच्छिमारी करतात आणि त्यांचे जीवन समुद्रावर अवलंबून आहे. या गावाची एक नैतिक, स्थिर आणि स्वच्छ जीवनशैली आहे.
गावात जास्त काही उपलब्ध नाही. सर्व साहित्य म्हणजेच फळं, भाज्या, औषधं आणि इतर गरजा होडीद्वारे समुद्रकिनाऱ्यावरील गावांमधून आणावं लागतात. तसेच, या गावात कोणताही दवाखाना नाही, ज्यामुळे इथे राहत असलेल्या लोकांना बाह्य क्षेत्रात जाऊनच उपचार घेतले जातात.
पावसाळ्यात समुद्र अधिक उग्र होतो आणि होडीचे प्रवास कठीण होतो, पण या परिस्थितीतही गावातील लोक समुद्राचा खडतर प्रवास करुन दुसऱ्या गावांमध्ये जातात. समुद्राच्या अशा बदलांना गावकऱ्यांनी जुळवून घेतले त्यामुळे गावकरी आणखी मजबूत बनले आहेत.
या गावात खूपच शांतता आहे. जिथे लोक परस्परांशी चांगली नाती ठेवतात आणि एकमेकांच्या मदतीसाठी तयार असतात. ते एकमेकांच्या जीवनाचा हिस्सा असतात आणि त्यात एक विशेष प्रकारचा सहकार्य आणि समर्पण असतो.
अशा या शांत आणि निसर्गसंपन्न गावात जीवनाची चाल वेगळी आहे आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळेल. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले हे गाव निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि त्याच्या साध्या जीवनशैलीतून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. ही एक अशी जागा आहे, जिथे प्रत्येकाला जीवनाचे खरं सौंदर्य आणि शांती मिळू शकते.