होळी म्हटलं की शिमगा आठवतो आणि शिमगा म्हटलं की कोकण. पण, ही होळी मुंबईसह अलिबाग पट्ट्यातील कोळीवाड्यांमध्येही तितक्याच उत्साहात साजरी केली जाते.
महाराष्ट्रात सध्या सर्वत्र होळीचा उत्साह पाहायला मिळत असून, विविध जिल्ह्यांमध्ये विविध पद्धतीनी हा सण साजरा केला जात आहे. होळी म्हटलं की शिमगा आठवतो आणि शिमगा म्हटलं की कोकण. पण, ही होळी मुंबईसह अलिबाग पट्ट्यातील कोळीवाड्यांमध्येही तितक्याच उत्साहात साजरी केली जाते.
कोळीवाड्यांमधील होळी... कोकणच नव्हे, मुंबईच्या कोळीवाड्यांमधील होळीसुद्धा तितकीच खास. पारंपरिकपण जपतानाच उत्सवातील उत्साह तसुभरही कमी होऊ न देता हा सण साजरा केला जात आहे.
खुद्द आमदार आदित्य ठाकरे यांनीसुद्धा त्यांच्या वरळी मतदारसंघातील वरळी कोळीवाडा इथं जाऊन या होळीच्या उत्सवात सहभाग घेतला. उपविभाग प्रमुख हरीश वरळीकर कुटुंबियांसह होलिकोत्सवात सहभागी होऊन त्यांनी सर्व स्थानिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
नवरंग होळी मंडळ, बाजार गल्ली, वरद वरळीकर अशा विविध होळ्यांना भेट देत त्यांनी स्थानिकांच्या विनंतीस मान देऊन या उत्सवाची शोभा वाढवली.
होळीच्या एक दिवस आधी होळी साजरी करण्याची जुनी परंपरा वरळी कोळीवाड्याने यंदाही जपली. कोळीवाड्यातील प्रत्येक गल्ली गल्लीत होळीची तयारी पाहायला मिळाली.
होळीचा हा उत्साह पाहून आदित्य ठाकरेसुद्धा भारावून गेले. यावेळी त्यांनी स्थानिकांसह पारंपरिक तालावर ठेकाही धरल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे ठेका धरत असतानाच स्थानिकांनी एकच कल्ला केल्याचं पाहायला मिळालं.
'होळी हा आपला पारंपरिक सण आहे, मी दरवर्षी इथे येत असतो. तोच उत्साह तोच जल्लोष दरवर्षी इथे पाहायला मिळतो', असं ते म्हणाले. ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांकडून कोळीवाड्यावर होळीसाठी निर्बंधांबाबतच्या वक्तव्यांवरही टीका केली. 'यांचा स्पीकरला विरोध, यांचा पीओपीच्या गणपतीला विरोध, भाजप हिंदुत्ववादी आहे हे फेक नरेटीव लोकांच्या लक्षात येत आहे' असं म्हणत टीका केली. (सर्व छायाचित्र- आदित्य ठाकरे / X)