Indian Cricketer Aakash Deep Struggle Story : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना भारताने 336 धावांनी जिंकून सीरिज 1-1 अशा बरोबरीत आणली. भारताचा वेगवान गोलंदाज आकशदीप हा या विजयाचा शिल्पकार ठरला त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या 6 विकेट घेतल्या. यानंतर त्याचं सर्वस्थरातून कौतुक होत आहे. मात्र 28 वर्षांच्या आकाशदीपने यशाचं शिखर गाठण्यासाठी भरपूर संघर्ष केलायं.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही. त्यामुळे आकाशदीपला दुसऱ्या सामन्याकरता टीम इंडियात संधी मिळाली. आकाशने पहिल्या इनिंगमध्ये 4 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 6 अशा इंग्लंडच्या एकूण 10 विकेट घेतल्या.
इंग्लंडमध्ये एका टेस्ट सामन्यात 10 विकेट घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज आहे. शेवटच्या दिवशी आकाशदीपने तब्बल 4 विकेट घेतल्या आणि इंग्लंडला 271 धावांवर रोखले.
आकाशदीप हा बिहारच्या सासाराम शहरातील रहिवासी असून त्यानं एका मुलाखतीत सांगितलं की त्याच्या वडिलांचा आकाशच्या क्रिकेट खेळण्याला विरोध होता. तो म्हणाला की, 'माझ्या वडिलांना माझं क्रिकेट खेळणं अजिबात पसंत नव्हतं, त्यांना वाटायचं की क्रिकेट खेळणं हा गुन्हा आहे. मी ज्या पाश्वभूमीतून येतो तिथे क्रिकेटमध्ये कोणतंही भविष्य नाही अशी मान्यता आहे'.
आकाशदीप म्हणाला की, त्याचा वडिलांना वाटतं होतं आपल्या मुलाने सरकारी नोकरीची परीक्षा द्यावी. वडिलांच्या विरोधामुळे आकाश लपून छपून क्रिकेट खेळायला जायचा.
2015 हे वर्ष आकाशदीपसाठी खूपच अवघड होतं. अर्धांगवायूमुळे आकाशच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्याचवर्षी वाराणसीतील एका रुग्णालयात घेऊन जाताना आकाशच्या मोठ्या भावाचं सुद्धा निधन झालं. या सर्व कठीण काळात आकाश जवळपास 3 वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला.
परंतु त्याने नंतर दुर्गापुर (बंगाल) मध्ये आल्यावर पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू लागला. आकाशदीपने आतापर्यंत 38 फर्स्ट-क्लास करिअरमध्ये 128 विकेट घेतले आहेत.
2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध आकाशदीपचं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण झालं होतं. त्याने आतापर्यंत 8 सामने आणि 11 इनिंगमध्ये एकूण 25 विकेट घेतल्या असून 89 धावा केल्या आहेत.
दुसऱ्या टेस्ट सामन्यात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर आकाशदीपने त्याच्या कामगिरीचं श्रेय आपल्या बहिणीला दिलं. आकाशदीपची बहीण मागील २ महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देतेय. आकाशदीप म्हणाला की, 'मी अजूनपर्यंत हे कोणालाच सांगितले नव्हते. मी हा विजय माझ्या मोठ्या बहिणीला समर्पित करू इच्छितो. ती मागील 2 महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहे. ती या आजारपणामुळे मानसिक तणावात होती, पण हा सामना बघून तिला नक्कीच आनंद झाला असेल. मी हा सामना तिलाच समर्पित करून खेळत होतो, मला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता'.