Saif Ali Khan Attack Case Court Hearing: वांद्रे कोर्टात या प्रकरणामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये नक्की काय झालं याची माहिती आरोपीच्या वकिलाने दिली आहे. कोर्टामध्ये सैफ आणि करिनाच्या त्या रात्रीच्या वागण्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं वकिलाने म्हटलं आहे. नेमकं कोर्टात आज काय घडलं पाहूयात...
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावरुन आरोपीच्या वकिलांनी सैफ आणि त्याच्या पत्नीसंदर्भात म्हणजेच करिनासंदर्भातच काही प्रश्न उपस्थित केलेत. तसेच घेतलेले फिंगर प्रिंट ग्राह्य नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. नक्की या वकिलाने काय म्हटलंय पाहूयात...
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपी शरीफुल इस्लाम सज्जद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीरला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज वांद्रे कोर्टात झालेल्या सुनावणीसंदर्भातील माहिती आरोपीचे वकील संदीप शेरखाणे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यावेळेस संदीप यांनी आपण आरोपीला अधिक अधिक पोलीस कोठडी देण्याची मागणीला विरोध केल्याचं सांगितलं. तसेच या सुनावणीत नक्की काय काय घडलं हे सुद्धा संदीप यांनी सांगितलं.
"आज पोलिसांनी आरोपीची कोठडी वाढवून मागितली. मात्र आम्ही आरोपीला दिर्घकाळ कोठडी देण्याच्या मागणीला विरोध केला. यापूर्वीच हत्यार आणि इतर गोष्टींसंदर्भातील तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळेच पोलीस कोठडीची गरज नसल्याचं कोर्टात सांगितलं," असं संदीप यांनी स्पष्ट केलं.
"सीडीआर आणि तपासासंदर्भातील इतर चौकशीसाठी आरोपीला कोठडीत ठेवण्याची गरज नसते, याबद्दलचा युक्तीवाद कोर्टासमोर केला. त्यावर सरकारी वकिलांनी हत्यार जप्त करण्यात आल्यासंदर्भातील मुद्दे मांडले. हे हत्यार आरोपीने कुठून आणि कसं आणलं याची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे," असं संदीप म्हणाले.
"आरोपीचा चेहरा हा अटकेत असलेल्या आरोपीच्या चेहऱ्याशी मेळ खाणार नाही," असंही संदीप यांनी म्हटलं आहे. 109 कलम पोलिसांनी लावलेलं नसल्याचंही संदीप म्हणाले.
आरोपीने वापरलेलं हत्यार आणि कपडे पोलिसांनी जमा करुन फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती संदीप यांनी दिली आहे.
सैफने कोणत्याही जबाबदार व्यक्तीला फोन करुन हल्ल्याची माहिती का दिली नाही? असा सवाल संदीप यांनी उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना, "करीना कपूरने 103 हेल्पलाइन क्रमांकावर इतर कोणत्याही हेल्पलाइन क्रमांकावर फोन का केला नाही? पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचणं आवश्यक होतं," असंही संदीप यांनी म्हटलं आहे.
"हल्ला झाल्यानंतर 1 तासाने सैफ अली खान रुग्णालयात दाखल झाला. हे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं आहे," असं संदीप यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.
तसेच जे बोटांचे ठसे घेण्यासंदर्भात संदीप यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. "पोलिसांना फिंगर प्रिंट हवे होते तर त्या इमारतीला कॉरिडोअरमध्ये प्रवेशबंदी का करण्यात आली नाही?" असं संदीप यांनी विचारलं आहे.
"फिंगर प्रींट घ्यायचे होते तर पोलिसांनी इमारत आणि सैफला फ्लॅट सील करायचा हवा होता. मात्र हे काही करण्यात आलं नाही. फॉरेन्सिकचं कोणतंही पत्र पाठवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे घेण्यात आलेले बोटांचे ठसेही कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरले जाणार नाहीत," असं संदीप म्हणाले.
मॅटर हाइप झाल्याने आरोपी घाबरला आहे. मी काहीही केलेलं नसून मला फसवण्यात आलं आहे. त्याचं वडिलांशीही बोळणं झालं असून व्हिडीओत दिसणारी व्यक्ती आपण नसल्याचा आरोपीचा दावा आहे, असंही संदीप यांनी म्हटलं.