Suvrat Joshi Mother Photos : 90`s Kid असाल तर त्यानं लिहिलेला प्रत्येक शब्द वाचताना डोळ्यापुढं स्वत:चेच आईवडील येतील... पाहा हे सुरेख फोटो...
Suvrat Joshi Mother Photos : अभिनेत्री सखी गोखलेचा पती आणि एक उत्तम अभिनेता सुव्रत जोशी सध्या परमोच्च शिखरावर आहे. कारण...? कारण, त्यानं आईला थेट साहेबांच्याच देशाची सफर घडवून आणली आहे. साहेबांचा देश म्हटल्यावर इथं वेगळ्यानं देशाचं नाव घ्यायला नको .... नाही का!
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सुव्रतनं यावेळी पत्नी नव्हे तर, त्याचा आईचा एक अनुभव, आईच्या इंग्लंड वारीचे काही फोटो शेअर केले. या फोटोसोबत त्यानं मनातील उत्साह, कुतूहल आणि अनेक अव्यक्त भावनांना वाटही मोकळी करून दिली. आपल्या आईनं पहिल्यांदाच बूट वापरण्यापासून तिला सनग्लासेस देऊ करेपर्यंतचा अनुभव सुव्रतनं या फोटोंमध्ये मांडला.
आईनं केलेल्या या अविस्मरणीय भेटीविषयी त्यानं लिहिलं, 'मध्यमवर्गीय परिस्थितीत वाढवतानाही आई- बाबांनी,नेहेमीच मला अनुभवाच्या पातळीवर सकस आणि सुंदर असे काय मिळेल याची काळजी घेतली. खिशाला खार लावून,धाडस करून उत्तमोत्तम पुस्तके, चित्रपट आणि नाटक माझ्या बालपणाच्या ओंजळीत भरभरून ओतली. यात स्वतःच्या इच्छांना मुरड घातली. मी माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून जे काही थोडेफार कमावले त्याच्यात या बालपणी मिळालेल्या विविधरंगी अनुभवाच्या कंपास पेटीचा सिंहाचा वाटा आहे.'
वडिलांच्या अनुपस्थितीतही आता आपली आई नेटाने, स्वाभिमानाने आयुष्याचा एक एक धागा विणतेय असं म्हणताना तिच्या आनंदाची आणि सुरेख अनुभवांची जबाबदारी माझी असल्याचं त्यानं या कॅप्शनमधून म्हटलं.
'आता बाबा नाही पण म्हणून आईने माझ्या नजरेतून लंडन बघावे अशी तीव्र इच्छा होती. अखेर या उन्हाळ्यात सगळे जुळून आले. आईच्या लंडनवारीची तयारी करायला घेतली. भरपूर पायपीट करायची असल्याने तिला बूट घ्यायचे ठरले. तिच्या पायाचे AI mapping करून वगैरे अगदी अद्ययावत बूट घेतले खरे, पण ते घातल्या घातल्या आईचा थोडा तोल गेला. तिने आयुष्यात पासष्टव्या वर्षी प्रथमच बूट घातले होते. आजवर याआधी तिने कधी बुटच घातले नाहीत. इतकी बारीक आणि तरीही मोठी गोष्ट कधी माझ्या ध्यानातच आली नव्हती', असं तो म्हणाला.
आयुष्यभर स्वतःचे पाय नेहमी जमिनीवर ठेवायची आणि आमचेही पाय जमिनीवर राहतील याची तिने कसोशीने काळजी घेतली, सांगताना आईचा एक गमतीशीर अनुभव त्यानं तितक्याच गमतीशीर शब्दांत मांडला.
'तिला कौतुकाने आणि थोडी शायनिंग मारायला काळा चष्मा पण घेतला. फार चिकणी दिसते ती त्याच्यात. श्रीमंत, समवयीन, गोऱ्या पुरुषांना न कळताच ‘check out’ मारायची सोय करून घेतली तिने. आपल्या आधीच्या पिढीने साधं जगायची साधना केली. त्याचा प्रचंड आदर आहेच. ती मूल्य हरवू न देता त्यांनीही थोडी चैन करावी… आणि त्यांना त्याची चोरी वाटू नये अशी तजवीज आपण त्यांच्यासाठी करावी', असं म्हणत आईची इंग्लंडवारी टप्प्याटप्प्यानं सर्वांच्या भेटीला आणण्याची हमी सुव्रतनं दिली.