Sobhita Dhulipala Shares Wedding Photos : एकिकडे अभिनेता (Naga chaitanya) नागा चैतन्य याच्यासोबतच्या कथित रिलेशनशिपमुळं ती चर्चेत आलेली असतानाच दुसरीकडे तिनं शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांच्याच नजरा वळवल्या.
कुठे शोभिता हळदी समारंभात हळदीनं माखलेली दिसली, तर कुठे प्रत्येक लहामनोठ्या क्षणाचा आनंद घेताना दिसली. मेहंदीपासून संगीतपर्यंत प्रत्येक सोहळ्यासाठी तिनं खास वेशभूषेला पसंती दिली होती. तिचा लूक सर्वांमध्ये अधिकच उठावदार दिसत होता. बरं या साऱ्यामध्ये समंताला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
शोभिता... समंता... काहीतरी गोंधळ होतोय का? नागा चैतन्य आठवतोय? इथं त्याचा काहीही संबंधच नाही. कारण, ही समंता म्हणजे शोभिताची बहीण. तिच्याच लग्नाच्या निमित्तानं शोभितानं गेले काही दिवस धमाल केली.
बहिणीच्या लग्नातील प्रत्येक क्षण शोभितानं चाहत्यांच्या भेटीला आणला. दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय अशा पद्धतींनी पार पडलेल्या या विवाहसोहळ्याच्या निमित्तानं तिचं कुटुंबही सर्वांनाच पाहता आलं.
जबाबदार बहीण, म्हणून शोभितानं अतिशय सुरेखपणे समंताच्या लग्नाची सर्व व्यवस्था पाहिली होती. ती कामात इतकी व्यग्र होती, की सुरुवातीचे काही समारंभ तिला छानसं तयारही होता आलं नव्हतं. एका पोस्टमधून तिनं याची खंतही व्यक्त केली.
'तारा खन्ना', या 'मेड इन हेवन'मधील पात्राचा उल्लेख करत आपण नियोजन आणि हिशोबामध्येच गुंतल्याचं तिनं सांगितलं. 'तो क्षण अतिशय भावनिक होता, किंबहुना मला रडूही आलं कारण समंताला मी पहिल्यांदाच असं वधुरूपात पाहिलं होत', असं तिनं एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.
बहिणीला मेहंदी लावता आली नाही याची खंत शोभिताला राहिली, पण तिच्यासाठीच सर्व व्यवस्था केली आणि सर्वांना ती आवडलीसुद्धा याचा दिलासाही तिला होता.
(सर्व छायाचित्रं- शोभिता धुलिपाला/ इन्स्टाग्राम )