Actress Got Adult Role: ती दुसऱ्या देशातून आली असून तिने हिंदीमधील 3 रिअॅलिटी शो गाजवले आहेत. मात्र तिला भारतात आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात स्थिरावण्यासाठी करावे लागलेले कष्ट, तिच्या आई वडिलांचा तिला नसलेला पाठिंबा यासारख्या गोष्टींबद्दल ती पहिल्यांदाच उघडपणे बोलली आहे. 'छोटे कपडे घालतेस, पैसेही कमवत नाहीस मग असल्या गोष्टींचा काय फायदा?' असा प्रश्न तिला तिच्या आईनेच विचारला होता. तिने इंडस्ट्रीमधील धक्कादायक खुलासे केले आहेत. जाणून घेऊयात कोण आहे ही अभिनेत्री आणि तिचं म्हणणं काय...
'स्प्लिट्सव्हिला'च्या 14 व्या पर्वाची विजेती असलेली साउंडस मौफकीर सध्या सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत आहे. 'रोडीज' आणि 'स्प्लिट्सव्हिला' या कार्यक्रमांनंतर आता 'खतरों के खिलाड़ी'मधील कामगिरीसाठी साउंडस मौफकीर चर्चेत आहे. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या अभिनेत्रीने धक्कादायक खुलासे केले आहेत.
'रोडीज' आणि 'स्प्लिट्सव्हिला'दरम्यान आपल्याला कोणतेही मानधन मिळाले नव्हते. आपण बचत केलेल्या पैशांमधून सुरुवातीच्या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये आपण इंडस्ट्रीमध्ये तग धरु शकलो असं साउंडस मौफकीरने म्हटलं आहे.
मोरक्कोमधून भारतामध्ये मनोरंजन सृष्टीमध्ये काम करण्यासाठी आलेल्या साउंडस मौफकीरने तिचे पालक तिच्या पाठीशी नव्हते असंही म्हटलं आहे. 'खतरों के खिलाड़ी'च्या 13 व्या पर्वासाठी आपण हिंदी शिकल्याचंही तिने यापूर्वीच सांगितलं होतं.
'ईटी टाइम्स टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोल्डनेसमुळे चर्चेत असलेल्या साउंडस मौफकीरने आपली कौटुंबिक पार्श्वभूमी फारच पारंपारिक पद्धतीची असल्याचं सांगितलं. मी फायनान्समध्ये एमबीएपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे, असं ती म्हणाली.
मात्र शिक्षणाच्या वेळेस मी स्वत:च्या दिसण्याकडे फारसं लक्ष देत नव्हते. आता मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे तिथे आपण कसे दिसतो हे फार महत्त्वाचं आहे. आपण कसे दिसतो, कोणते कपडे परिधान करतो या गोष्टी महत्त्वाच्या असून याची माझ्या आईला सवय नसल्याने तिला हे खटकलं, असं साउंडस मौफकीरने सांगितलं.
मी आता आर्थिक दृष्ट्याही चांगली कमाई करत आहे. मात्र मला 'स्प्लिट्सव्हिला'साठी मानधन देण्यात आलं नाही. त्यामुळेच जिथे पैसे दिले जात नाहीत त्या कार्यक्रमासाठी तू 3 महिने का जात आहेस असा प्रश्न मला आईने विचारला होता, असंही साउंडस मौफकीरने सांगितलं.
अशाप्रकारे वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याबरोबरच सर्व काही ठीक होईल यावर विश्वास ठेवत स्वत:ला प्रोत्साहन देणं फार कठीण होतं, असं त्या दिवसांबद्दल बोलताना साउंडस मौफकीर म्हणाली.
आपल्या मुलांनी 30 व्या वर्षाआधी चांगली नोकरी करावी, सेटल व्हावं, स्थीर जीवन जगावं असं अनेक पालकांना वाटतं. तेच माझ्या पालकांना वाटायचं. माझी आई तर मला, छोटे कपडे घालतेस, पैसेही कमवत नाहीस मग ही सारी खटाटोप करण्याचा फायदा काय? असंही विचारायची असं साउंडस मौफकीरने सांगितलं.
भारतामधील मनोरंजन सृष्टीतील काही नावाजलेल्या लोकांनी आपल्याकडे न्यूड आणि सेमी-न्यूड रोलसाठी आपल्याशी संपर्क साधला होता असा गौप्यस्फोटही साउंडस मौफकीरने या मुलाखतीत केला.
"सुरुवातीला मला हे असे कमी महत्त्वाच्या आणि विचित्र भूमिका ऑफर केल्या जायच्या. मला सुरुवातीला याचं फार वाईट वाटायचं की हे लोक माझ्याकडे अशा नजरेने पाहतात. मात्र यातून त्यांना चुकीचं ठरवण्यासाठी अधिक मेहनत करण्याची शक्ती मिळायची," असं साउंडस मौफकीर म्हणाली.
"मला न्यूड आणि सेमी न्यूड भूमिका ऑफर करणाऱ्यांना सांगायचे की मी हिंदी बोलू शकते, अभिनय करु शकते आणि नाचूही शकते. मला इतर भूमिका देता येतील असं मला त्यांना सांगायचं होतं," असं साउंडस मौफकीर म्हणते.
मोरक्कोमधून भारतात स्थायिक झालेल्या साउंडस मौफकीरने आपला मूळ देश सोडून इतर ठिकाणी एकटं राहणं आणि मनोरंजन सृष्टीत काम करणं फार कठीण असल्याचं सांगितलं.
दुसऱ्या देशात राहताना सर्व खर्च आणि आपल्या कामाबरोबरच मानसिक पाठिंब्याचीही आवश्यकता असते. माझे पालक मला पाठिंबा देत नव्हते. म्हणून मला फारच वाईट वाटायचं. ते आजही एखाद्या कलाकाराकडे सन्मानाने पाहिलं जाऊ शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असं साउंडस मौफकीर म्हणाली.