अळुवडी हा अनेकांचा जीव की प्राण पदार्थ आहे. श्रावणात व गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी हमखास घराघरांत अळुवडी केली जाते. आज आम्ही तुम्हाला अळुवडीची खास रेसिपी सांगणार आहोत.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांची स्पेशल अळुवडी रेसिपी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ऐश्वर्या नारकर यांनी खास पदार्थ वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळं अळुवडीला छान चव येते.
ऐश्वर्या नारकर यांनी बेसनाऐवजी मुगाचे पीठ वापरा असा सल्ला दिला आहे. तसंच, तांदळाच्या पिठाने वड्या छान खुसखुशीत होतात.
1 वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, पाव वाटी तांदळाचे पीठ, चिंचगुळाचा कोळ, लाल तिखट, मीठ, धणे जीरेपुड, तळण्यासाठी तेल
एका भांड्यात मुगाच्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घ्या. या पीठात तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड, मीठ आणि चिंचेचा कोळ घालून पीठ चांगले कालवून घ्या.
अळुच्या पानाची देठं कापून ती पान लाटण्याने लाटून घ्या. म्हणजे त्याच्या शिरा दबून जातील आणि अळुवड्या कुरकुरीत होतील.
आता पानांच्या एका बाजुला सारण लावून घ्या आणि पानं दुमडून घेत चला. अशाप्रकारे एकावर एक पानं ठेवून अळुवडीचा उंडा तयार करुन घ्या.
आता अळु वडीचे उंडे 10 ते 20 मिनिटे वाफवून घ्या. उंडे थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्या.
आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात या वड्या कुरकुरीत होईपर्यंत शॅलोफ्राय करुन घ्या.