Asia Cup 2023 India Vs Sri Lanka World Record: भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या 'सुपर-4'च्या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत केलं. मात्र हा सामना फारच स्लो स्कोअरिंग गेम ठरला असं अनेकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या सामन्यात फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. हा सामना भारताने जिंकला असला तरी सामन्यात श्रीलंकेने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला असून हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणं जवळजवळ अशक्य मानलं जात आहे. हा विक्रम कोणता ते पाहूयात...
भारतीय संघ हा आशिया चषक स्पर्धेमधील दादा संघ मानला जातो. आकडेवारी पाहिली तर भारतीय संघाचा या स्पर्धेत दबदबा का आहे हे समजून येतं. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेमध्येही भारताने अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
भारताने मंगळवारी श्रीलंकेला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. खरं तर भारताने ही स्पर्धात सर्वाधिक वेळा जिंकली असून त्या खालोखाल श्रीलंकेचा क्रमांक लागतो. मात्र 'सुपर-4'च्या सामन्यामध्ये भारताविरुद्ध श्रीलंकेने असा काही विक्रम केला आहे की तो मोडणं जवळपास कोणालाच शक्य होणार नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंकन फिरकी गोलंदाजांसमोर नांगी टाकली. भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना रडतखडत जिंकला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांनी 356 धावांचा डोंगर उभा केला होता. विराट कोहली आणि के. एल राहुल यांची दमदार शतकं तर रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरुद्ध एवढा मोठा स्कोअर करुन सामना 228 धावांनी जिंकला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 128 धावांवर बाद झाला.
मात्र श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज उभेच राहत नव्हते की काय असं वाटण्याइतक्या नियमितपणे ते बाद होत होते. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्ध भारताला सर्वबाद 213 धावांपर्यंतच मजल मारता आली.
50 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर अक्सर पटेलच्या रुपात श्रीलंकेला 10 वी विकेट मिळाली आणि 5 चेंडू शिल्लक असतानाच भारताचा डाव संपला. श्रीलंकन गोलंदाज मागील बऱ्याच काळापासून भन्नाट गोलंदाजी करत असून त्यांनी भारतीय संघाच्या सर्व विकेट्स घेत अनोख्या विश्वविक्रमला गवसणी घातली.
भारताविरुद्धचा सामना हा श्रीलंकन गोलंदाजांसाठी सलग 14 वा सामना ठरला जेव्हा त्यांनी विरोधी संघातील सर्व खेळाडूंना बाद केलं. भारताने श्रीलंकेचा पराभव केला असला तरी मागील 13 सामने श्रीलंकेने सलग जिंकले होते.
कोणत्याही संघाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 14 सामन्यामध्ये विरोधी संघाला बाद करणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे श्रीलंकन संघाचा हा विश्वविक्रम पुढील बऱ्याच काळ टिकून राहील असं सांगितलं जात आहे.
डुनिथ वेललेज, चरिथ असालंका आणि महीश तीक्ष्णा या तिघांच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांना उभंही राहता येत नव्हतं की काय असा प्रश्न पडण्याइतकी वाईट फलंदाजी भारतीय संघाने केली. डुनिथ वेललेजने 5, चरिथ असालंकाने 4 तर तीक्ष्णाने एका भारतीय खेळाडूला बाद केलं.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलं की भारताचे सर्व फलंदाज फिरकी गोलंदाजांकडून बाद झाले. पाकिस्तानविरुद्धच्या साखळी फेरीतील सामन्यामध्ये भारतीय संघाचे सर्व खेळाडू वेगवान गोलंदाजीवर बाद झाले होते.