Asia Cup Ind vs SL Who is Dunith Wellalage: या 20 वर्षीय तरुणाने भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवली. भारतीय फलंदाजांना त्याचे चेंडू कसे खेळावेत हेच समजत नव्हतं. एका क्षणी तर त्याने अवघ्या 2 धावा देऊन भारताच्या सालामीवीरांपैकी रोहित शर्मा, शुभमन गील आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना तंबूचा रस्ता दाखवला अशी स्थिती होती. जगभरातून या 20 वर्षीय तरुणाचं कौतुक होतंय पण हा तरुण आहे तरी कोण आणि त्याने या सामन्यात कशी कामगिरी केलीय पाहूयात...
आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना हा भारत विरुद्ध डुनिथ वेललेज असा आहे की काय असं वाटत होतं. सध्या सोशल मीडियावरही अशीच चर्चा आहे.
एका क्षणी तर डुनिथ वेललेजने केवळ 2 धावा देत भारताचे 3 गडी बाद केले होते. 20 वर्षांच्या डुनिथ वेललेजसमोर भारतीय फलंदाज कोलमडून पडले. विराट, रोहित, शुभमन हे तिघेही डुनिथच्या गोलंदाजीवर अवघ्या 13 चेंडूंमध्ये एकामागोमाग एक तंबूत परतले.
सर्वात आधी डुनिथ वेललेजने भारताचा सालामीवर शुभमन गीलला बाद केलं. 25 चेंडूंमध्ये 19 धावा करुन शुभमन तंबूत परतला. डुनिथ वेललेजच्या फिरत्या चेंडूचा अंदाज शुभमनला आला नाही आणि चेंडूने त्याच्या बॅट आणि पॅडमधून थेट यष्ट्यांना धडकला.
12 व्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गेल्यानंतर 14 व्या ओव्हरमध्येच डुनिथ वेललेजने विराटला बाद केलं. विराटही अगदी स्वस्तात परतला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील शतकवीर विराट कोहली डुनिथ वेललेजच्या फिरकी गोलंदाजीवर चेंडू खेळून काढण्याच्या नादात बाद झाला. विराटला डुनिथ वेललेजने दासुन शनाकाकरवी झेलबाद केलं. विराट 12 चेंडूंमध्ये 3 धावा करुन तंबूत परतला.
त्यानंतर 16 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा 48 चेंडूंमध्ये 53 धावा करुन तंबूत परतला.
डुनिथ वेललेजच्या फिरकी गोलंदाजी खेळताना चेंडूने उसळी न घेतल्याने रोहित गोंधळला आणि चेंडूने रोहितच्या पाय आणि पॅडमधून गॅप काढत स्टम्प्सचा वेध घेतला.
30 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर के. एल. राहुल आणि इशान किशनची चांगली पार्टनरशीप होत असतानाच डुनिथ वेललेजच्या फिरकी गोलंदाजीवर राहुल झेलबाद झाला.
चेंडू खेळून काढण्याच्या नादात राहुलने गोलंदाज डुनिथ वेललेजला झेल दिला. राहुल 44 चेंडूंमध्ये 39 धावा करुन बाद झाला.
61 चेंडूंमध्ये 33 धावा करुन इशान किशन तंबूत परतला. भारताचा धावफलक 170 वर असताना भारताचा अर्धा संघ तंबूत परतला. 35 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चरिथ असलांकाच्या गोलंदाजीवर डुनिथ वेललेजने इशानचा भन्नाट झेल पकडला.
डुनिथ वेललेजने आपल्या शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर हार्दीक पंड्याला बाद केलं. हार्दिक पंड्याने 18 चेंडूंमध्ये पाच धावा केल्या.
डुनिथ वेललेजने त्याच्या 10 ओव्हरमध्ये 40 धावा देऊन 5 गडी बाद केल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
डुनिथ वेललेजच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. अवघ्या 20 वर्षांच्या फिरकीपटूने भारतीय फलंदाजांना सळो की पळो करुन सोडल्याचं सांगत बऱ्याच जणांनी त्याचं भविष्य उज्वल असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी तर भारत्या टॉप ऑर्डरला या 20 वर्षीय तरुणाने सुरुंग लावला असं म्हणत भारताचं स्कोअरकार्डही व्हायरल केलं आहे.
डुनिथ वेललेजशिवाय चरिथ असलांकानेही भारताचे 4 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह 12 चेंडूंमध्ये 5 धावा करुन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला फिरकीपटू कुलदीप यादव पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. या दोघांनाही चरिथ असलांकाने बाद केलं.
चरिथ असलांकाने रविंद्र जडेजा आणि इशान किशनलाही बाद केलं. भारताच्या सर्व विकेट्स श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनीच घेतल्या.
डुनिथ वेललेज हा श्रीलंकेच्या 2022 च्या 19 वर्षांखालील संघामध्ये होता. त्याने गोलंदाजीबरोबरच उत्तम फलंदाजीही केली होती. त्याने 6 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या. तर 264 धावाही त्याने केलेल्या.
डुनिथ वेललेजने 2022 मध्ये जून महिन्यात ऑस्ट्रेलियावरुद्धच्या सामन्या पदार्पण केलं. त्याने पहिल्याच सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या. तो गेल येथे जुलै 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामनाही खेळला होता.