PHOTOS

एकाच सामन्यात नेपाळने मोडले क्रिकेटमधले 5 World Records! आकडेवारी पाहून पायाखालची जमीन सरकेल

Nepal vs Mongolia List Of Records Broken By Nepal Team: लिंबू-टिंबू संघ म्हणून आजपर्यंत ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळ या छोट्याश्या देशाच्या टीमने आज टी-20 क्रिकेटमध्ये भीमपराक्रम केला आहे. या संघाने आशियाई गेम्स पुरुष क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात चौकार षटकारांचाच नाही तर विक्रमांचाही पाऊस पाडला आहे. या चिमुकल्या संघाने नेमके कोणते विक्रम स्वत:च्या नावावर केलेत जे इतर कोणत्याही संघाला जमले नाहीत ते पाहूयात...

Advertisement
1/16

भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसारख्या टी-20 मधील दादा संघांना जे मागील 15 वर्षांहून अधिक काळापासून म्हणजेच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाण्यास सुरुवात झाल्यापासून जमलं नाही ते लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या नेपाळने करुन दाखवलं आहेत. नेपाळच्या या कामगिरीची जगभरात चर्चा आहे.

2/16

आशियाई गेम्सच्या पुरुष क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यामध्ये भारताचा शेजारी असलेल्या नेपाळच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नेपाळच्या संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडले आहेत. नेपाळने या सामन्यात टी-20 मधील 5 वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. ते कोणते हे पाहूयात...

3/16

नेपाळच्या संघाने मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये तब्बल 314 धावा कुटल्या. विशेष म्हणजेच केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. 

4/16

आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये एकाच डावात कोणत्याही संघाने 300 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 300 धावा करणारा नेपाळ हा पहिला देश ठरला आहे.

5/16

नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाने टी-20 च्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. 34 चेंडूंमध्ये कुशलने शतक झळकावलं आहे.

6/16

कुशल मल्ला 50 चेंडूंमध्ये 137 धाव करुन नाबाद राहिला. त्याने 8 चौकार आणि 12 षटकार लगावले. म्हणजेच त्याने 104 धावा केवळ 20 चेंडूंमध्ये केल्या.

7/16

याशिवाय दीपेंद्र सिंह ऐरी नावाच्या नेपाळच्या फलंदाजाने टी-20 मधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं असून केवळ 9 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं आहे.

8/16

दीपेंद्रने आपल्या पहिल्या 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले. दींपेंद्र हा 10 चेंडूंमध्ये 52 धावा करुन नाबाद राहिला. त्याने एकूण 8 षटकार लगावले. षटकारामधूनच त्याने 48 धावा केल्या. उर्वरित 4 धावा त्याने 2 चेंडूंमध्ये केल्या.

9/16

दीपेंद्रने सिंहने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा टी-20 मधील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. दीपेंद्र सिंहने 10 चेंडूंमध्ये नाबाद 52 धावा केल्या म्हणजेच त्याने तब्बल 520 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

10/16

युवराजने 2007 साली झालेल्या टी-20 च्या पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना केवळ 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. याच सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले होते. 

11/16

नेपाळच्या फलंदाजांनी 314 धावांचा डोंगर उभारताना 26 षटकार, 14 चौकार लगावले. म्हणजेच नेपाळच्या फलंदाजांनी केवळ 44 चेंडूंमध्ये चौकार, षटकारांच्या माध्यमातून 212 धावा केल्या.

12/16

कुशल मल्लाने 50 चेंडूंमध्ये 137 धावांची खेळी केली. त्याने 12 षटकार आणि 8 चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 237 इतका होता. 

13/16

नेपाळने या सामन्यामध्ये टी-20 सामन्यामध्ये केलेल्या वर्ल्डरेकॉर्ड्सची ही यादीच त्यांच्या कामगिरीबद्दल भाष्य करण्यासाठी पुरेशी आहे.

14/16

नेपाळने दिलेल्या या अवाढव्य धावसंख्येचा पाठलाग करताना मंगोलियाचा संघ अवघ्या 41 धावांमध्ये तंबूत परतला. अवघ्या 13.1 ओव्हरमध्ये 41 धावा करुन मंगोलियाचा संघ तंबूत परतल्याने नेपाळने हा सामना 273 धावांनी जिंकला.

15/16

मंगोलियाचे 5 खेळाडू शून्यावर बाद झाले. मंगोलियाच्या केवळ एका फलंदाजाला दुहेरी घावसंख्या गाठता आली.

16/16

आश्चर्याची बाब म्हणजे नेपाळच्या गोलंदाजांनी 41 पैकी 23 धावा या अतिरिक्त दिल्या. यामध्ये 2 नो बॉल, 16 वाईड आणि 5 लेग बाईजचा समावेश आहे.





Read More