river: सैफ अली खानने आपल्याला लवकर आणि सुरक्षित रुग्णालयात नेल्याबद्दल भजन सिंग राणाचे आभार मानले, तसंच ...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला झाल्यानंतर त्याला रिक्षाने लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
भजन सिंग राणा या रिक्षाचालकाने सैफ अली खानला वेळेत रुग्णालयात पोहोचण्यात मदत केली.
दोन सर्जरी आणि पाच दिवसांच्या उपचारानंतर सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला असून, तो आपल्या घरी पोहोचला होता. यादरम्यान सैफने रिक्षाचालक भजन सिंग राणाची भेट घेतली.
सैफ अली खानने आपल्याला लवकर आणि सुरक्षित रुग्णालयात नेल्याबद्दल भजन सिंग राणाचे आभार मानले, तसंच त्याची गळाभेटही घेतली.
सैफने तुला काय सांगितलं असं विचारलं असता भजन सिंग म्हणाले की, "त्याने मला सांगितलं की, तू मला वेळेत रुग्णालयात पोहोचवलंस. मी आभारी आहे".
सैफने तुला घरी आल्यानंतर काही पैसे दिले का? असं विचारलं असता ते म्हणाले की, "ते त्यांनाच माहित. मी त्यावर बोलू शकत नाही. माझी काही मागणी नाही. जे त्यांना योग्य वाटेल ते त्यांनी द्याव. त्याने जे दिलं ते मी घेतलं".
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, सैफ अली खानने भजन सिंग राणा यांचे आभार मानताना त्यांना 50 हजार रुपये दिले आहेत.
याआधी मुंबईतील एका संस्थेने रिक्षाचालकाला आपल्या चांगल्या कामाची शाबासकी देत 11 हजारांचं रोख बक्षीस दिलं आहे.
याआधी भजन सिंग राणा यांनी सांगितलं होतं की, त्यादिवशी मी नाईट ड्युटीवर होतो. मी सैफला बिल्डिंगच्या गेटच्या बाहेर रिक्षात बसवलं होतं. तो जखमी अवस्थेत होता. त्याच्यासह लहान मुलगा आणि आणखी एक व्यक्ती होती. सैफने मला रुग्णालयात पोहोचायला किती वेळ लागेल असं विचारलं होतं. आम्ही 7 ते 8 मिनिटात पोहोचलो होतो.
पुढे त्याने सांगितलं होतं की, अभिनेत्याने तेव्हा सफेद रंगाचा कुर्ता घातला होता, जो पूर्णपणे रक्ताने माखला होता. त्याच्या मान आणि पाठीतून रक्त वाहत होतं. मी भाडंही घेतलं नव्हतं.
रिक्षातून उतरल्यानंतर 'स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे' असं वाक्य ऐकल्यानंतर रिक्षाचालकाला अभिनेत्याची ओळख पटली होती.