कलाजगत काळाच्या वेगानं कितीही पुढे आलं, तरीही त्यामध्ये योगदान देणाऱ्या कलाकारांना विसरणं निव्वळ अशक्य. हिंदी चित्रपटविश्वात नव्या संकल्पनांचा पायंडा घालून देणाऱ्या अशाच काही कलाकारांमध्ये अभिनेत्रींची नावं आवर्जून घेतली जातात. नर्गिस, सुरैय्या, गीता बाली, गीता दक्क ही त्यापैकीच काही नावं. अशाच अभिनेत्रींची एकाएकी आठवण होण्यामागचं कारण म्हणजे भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचे फोटो.
हा क्रिकेटपटू म्हणजे विराट कोहली. संघात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विराटची पत्नी, म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी बजावताना दिसत आहे. (Anushka Sharma Retro Look )
नुकतेच तिनं रेट्रो लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. 60 - 70 च्या दशकातील फॅशन, त्यालाच साजेशी वेशभूषा, हेअरस्टाईल आणि चेहऱ्यावर शब्दांतही मांडता येणार नाही इतकं सुरेख स्मित असा अनुष्काचा हा लूक नेटकऱ्यांची दाद मिळवून जात आहे.
तिचा हा लूक आहे, अन्विता दत्तच्या Qala साठी साकारण्यात आला होता. जिथं ती एक गाणं गुणगुणताना दाखवण्यात आली आहे. सोशल मीडियावर तुम्ही या गाण्याची झलक पाहिलीच असेल.
अनुष्काचा हा लूक इतका लाघवी आहे की, तिच्याकडे पाहून अनेकांनाच नर्गिस- गीता बाली यांची आठवण झाली आहे.
विराटच्या पत्नीचं रेट्रो रुप पाहून तुम्हाला गतकाळातील कोणती अभिनेत्री आठवली? (सर्व छायाचित्रे सौजन्य- अनुष्का शर्मा/ Instagram)