Chandrayaan 3 Is Cheaper Than Om Rauts Adipurush: चांद्रयान-3 मोहिम ही भारताच्या महत्त्वकांशी चंद्र मोहिमेचा तिसरा टप्पा आहे. श्रीहरीकोट्टा येथून चांद्रयान अवकाशामध्ये झेपावणार असून या मोहिमेची मागील अनेक वर्षांपासून तयारी सुरु होती. मात्र या मोहिमेच्या खर्चा संदर्भातील रंजक माहिती समोर आली आहे. नेमका या मोहिमेला खर्च किती झाला हे जाणून घेऊयात...
आज म्हणजेच 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेपावणार असून भारताची ही तिसरी चंद्र मोहीम इस्रो एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च केली जाणार आहे.
भारताच्या या महत्त्वाच्या मोहिमेचा खर्च हा 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या निर्मितीच्या खर्चापेक्षाही कमी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे.
चांद्रयान-3 लॉन्चिंग व्हेइकलच्या मदतीने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरील दुसऱ्या लॉन्च पॅडवरुन आकाशात झेपावणार आहे. यासंदर्भातील संपूर्ण तयारी झाली असून काऊण्ट डाऊन सुरु आहे. भारताची ही तिसरी मोहीम आहे.
दुसऱ्यांदा भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅण्डींगचा प्रयत्न करणार आहे. तसेच चांद्रयान-3 मधील रोव्हर चंद्रावर उतरवून तेथील माहिती मिळवण्याचा भारतीय शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.
यापूर्वी केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या 3 देशांना यशस्वीपणे चंद्रावर सॉफ्ट लॅण्डींग करता आली आहे. आणि चीनचा समावेश आहे. चांद्रयान-2 मोहीम काही प्रमाणात यशस्वी ठरल्यानंतर आता चांद्रयान-3 च्या माध्यमातून भारताची मोहीम यशस्वी होईल अशी आशा सर्वच भारतीयांना आहे.
चांद्रयान-3 मोहिमेसाठी आलेला खर्च हा 'आदिपुरुष' चित्रपटापेक्षाही कमी आहे. 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मितीसाठी 700 कोटी रुपये खर्च आला. मात्र काही बातम्यांनुसार हा चित्रपट 500 ते 600 कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आला.
इस्रोने चांद्रयान-3 चं सुरुवातीचं बजेट 600 कोटी पर्यंत असेल अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र या मोहिमेसाठी एकूण 615 कोटींचा खर्च आला आहे.
चांद्रयान-3 चा खर्च हा 'आदिपुरुष' चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
मात्र या चर्चेवरुन सोशल मीडियावर 2 गट पडले असून काहींना ही तुलना योग्य वाटलीय तर काहींना अयोग्य. मात्र बऱ्याच जणांनी अगदी स्वस्तात ही मोहीम राबवत असलेल्या इस्त्रोचं कौतुकही केलं आहे.
'आदिपुरुष' चित्रपट आणि चांद्रयान-3 च्या तुलनेला विरोध करणाऱ्यांनी तलना करण्यामागील तर्क सापडत नसल्याचं म्हटलं आहे.