सर्वात कमी व्याजदर म्हणजेच सर्वात स्वस्त कर्ज कसं मिळवायचं? हे आपल्याला माहिती नसतं.
Cheapest Loan:आपल्या प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कर्ज घ्यावे लागते. मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाचे हफ्ते प्रत्येकाला भरावे लागतात. घर, गाडी अशा गोष्टींसाठी आपण कर्ज देणाऱ्या बॅंका, संस्था शोधायला जातो. पण सर्वात कमी व्याजदर म्हणजेच सर्वात स्वस्त कर्ज कसं मिळवायचं? हे आपल्याला माहिती नसतं.
कोणती बॅंक व्याज कमी घेते, त्यावर आपण कर्ज देणारी बॅंक ठरवतो. पण तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज हवे असेल तर त्यासाठी आधीच तयारी करावी लागेल. कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी काही उत्तम टिप्स जाणून घेऊया, ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.
तुम्हाला परवडेल अशा दरात कर्ज शोधत असाल कर तुम्हाला क्रेडिट स्कोअर राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल तितक्या चांगल्या दरात तुम्हाला कर्ज मिळू शकेल. तुम्ही तुमची बिले वेळेवर भरत असाल, त्यात कोणती दिरंगाई करत नसाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. अशावळी तुम्ही पैसे परत करु शकता हा विश्वास बॅंकेला राहतो.
अगदी छोट्या रक्कमेचं कर्ज हवे असेल तर तुम्हाला फार कुठे शोध घेण्याची गरज लागणार नाही. पण जर तुम्ही थोडे मोठे कर्ज घेत असाल तर आधी काही बँकांची तुलना करा. तुलना करताना फक्त व्याजदर बघू नका, तर इतर छुपे शुल्क देखील पहा. संबंधित बँक किती प्रक्रिया शुल्क आकारते? व्याजदर निश्चित आहे की बदलत राहणारा आहे? इतर कोणतेही शुल्क आकारले जात आहे का? हे पाहा. कारण काही बॅंका व्याजदर कमी दाखवतात पण त्यांचे इतर छुपे खर्च जास्त असतात.
बॅंकांनी सांगितलं म्हणजेच इतकाच इंट्रेस्ट रेट असं नाही. तुम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करा. इतर बॅंकांशी तुलना केल्यानंतर तुम्हाला परवडणारा इंट्रेस्ट रेट मॅच करुन घ्या. वाटाघाटी केल्यानंतर तुम्हाला कमी इंट्रेस्ट रेट असलेलं कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते.
जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेत असाल तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. सुरक्षित कर्जाचे व्याजदर असुरक्षित कर्जापेक्षा कमी आहेत. म्हणजेच, शक्य असल्यास, तुम्ही फक्त सुरक्षित कर्ज घ्या. जेणेकरून तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकेल. तुम्ही तुमच्या FD, म्युच्युअल फंड किंवा इतर कोणत्याही गुंतवणुकीवर सुरक्षित कर्ज घेऊ शकता.
बऱ्याचदा बँकेकडून कर्ज घेता तेव्हा दीर्घ कालावधीसाठी EMI केल्यास, तुम्हाला कमी व्याजदराची ऑफर दिली जाते. कमी व्याजदराचा अर्थ प्रत्येकवेळेस तुम्ही कमी व्याज देत आहात, असा होत नाही. खिशाला परवडेल इतका कमी ईएमआय ठेवा. शक्य असेल तर कर्जाचा कालावधी कमी राहीलं याचा प्रयत्न करा. जेणेकरून कर्जाची परतफेड करणे सोपे होईल आणि तुमच्या खिशातून अतिरिक्त पैसे बुडणार नाहीत.
1 मिनिटात लोन, मोबाईलवर लोन, कागदपत्र न घेता कर्ज अशा भूलथापांना बळी पडू नका. कर्जाच्या नावावर कमाई करणारे अनेक घोटाळेबाज मार्केटमध्ये आहेत. काहीजण कर्ज देतो सांगून तुमच्याकडूनच आधी पैसे मागतात. काहीजण टक्केवारीवर पैसे देतात. ज्याचा इंट्रेस्ट चक्रवाढ दराने वाढतो. त्यामुळे बॅंका, विश्वासू संस्थेतूनच कर्ज घ्या.