CIDCO Homes : सिडकोच्या या निर्णयामुळं नेमके कोणते बदल होणार आहेत आणि त्या बदलांचा कोणाला फायदा होणार आहे? पाहा...
CIDCO Homes : नवी मुंबई क्षेत्रामध्ये नागरिकांना गृहसंकुलांच्या माध्यमातून घराच्या उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सिडकोची आगामी सोडत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सोबतच चर्तेत भर पडतेय ती म्हणजे सिडकोच्या एका निर्णयाची. या निर्णयामुळं अनेकांनाच फायदा होणार असल्याचा दावा केला जात असल्यामुळं सिडकोच्या घरधारकांसाठी ही मोठी बातमी ठरत आहे.
सिडकोच्या घरधारकांना राज्य सरकारने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. ज्यानुसार यापुढे सिडकोचं घर विकायचं असेल, तर सिडकोची परवानगी लागणार नाही. घरं आणि सोसायटी लीजऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
येत्या कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी हा निर्णय ठेवला जाणार असल्याची घोषणा सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केली. सिडकोची घरे आता राहणाऱ्या लोकांची होणार आहेत. नवी मुंबई, छत्रपती संभाजी नगर, नाशिक आणि नागपूरमध्ये सिडकोच्या घरात राहणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
सिडकोने राज्यात विविध उत्पन्न गटातल्या नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर घरे बांधली. तर काही ठिकाणी प्लॉटच्या माध्यमातून जागांची विक्री केली.
मात्र सिडकोची मालमत्ता फ्री होल्ड करावी अशी मागणी कित्येक वर्षांपासून केली जात होती. कारण या घरांवर मालकी हक्क सिडकोचा राहत होता.
सिडकोच्या परवानगीशिवाय घरं विकता येत नव्हतं. आता मात्र सिडकोचं घर विकायचं असेल तर सिडकोची परवानगी लागणार नाही, ज्याचा फायदा अनेक घरधारकांना मिळणार आहे.