CSK Win IPL Final 2023 Celebration Photos: इंडियन प्रमिअर लिगच्या 2022 च्या पर्वामध्ये नवव्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पुढच्याच वर्षी म्हणजेच यंदाच्या वर्षी थेट चषक जिंकला. चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा चषकावर नाव कोरलं आणि इतिहास घडवला. या विजयानंतर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ते चषक स्वीकारण्यासाठी धोनीबरोबर आलेल्या दोन खेळाडूंनी. नेमकं काय घडलं पाहूयात...
चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी गुजरात टायटन्सवर विजय मिळवत इंडियन प्रमिअर लिगची ट्रॉफी पाचव्यांदा जिंकली.
चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला रविंद्र जडेजा. रविंद्र जडेजाने शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
चेन्नईच्या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने जडेजाला मैदानातच उचलून घेतल्याचं पहायला मिळालं.
चेन्नईच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला फोटो ठरतोय तो चषक स्वीकारतानाचा फोटो.
सामान्यपणे चषक जिंकल्यानंतर कर्णधार तो स्वीकारायला जातो. मात्र आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात एक नाही तर सीएसकेचे तीन खेळाडू चषक स्वीकारण्यासाठी आले.
झालं असं की, चषक स्वीकारण्यासाठी धोनीला आमंत्रित करण्यात आलं असता त्याने अंबती रायडू आणि रविंद्र जडेजाला चषक स्वीकारण्यासाठी मंचावर बोलावलं.
अंबती रायडूचा हा आयपीएलमधील अंतिम सामना होता तर रविंद्र जडेजाने हा अंतिम सामना अगदी शेवटच्या चेंडूवर जिंकवून दिल्याने धोनीने या दोघांना चषक स्वीकारण्यासाठी बोलावलं.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते सीएसकेच्यावतीने अंबती रायडू आणि जडेजाने ट्रॉफी स्वीकारली.
रायडूने अंतिम सामन्यामध्ये 8 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या. मात्र सरळ फटका मारण्याच्या नादात तो मोहित शर्माच्या गोलंदाजीवर कॉट अॅण्ड बोल्ड झाला.
अंबती रायडूबद्दल बोलताना धोनीने, "भारत अ पासून तो माझ्याबरोबर खेळतोय. संघासाठी 100 टक्के योगदान देणारा खेळाडू आहे. चांगल्या काळाबरोबर माझा संघ फेअर प्लेमध्ये नव्हता तेव्हाही तो माझ्यासोबत होता. तो माझ्यासारखाच आहे, तोही मोबाईल फार वापरत नाही," असं म्हटलं.
ऋतुराज गायकवाडने सामन्यानंतर, "हा विजय आम्ही अंबती रायडूला समर्पित करत आहोत," असं म्हटलं.
सीएसकेचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी, "अंबती रायडू हा विश्वासार्हता असणारा खेळाडू आहे. शेवटच्या सामन्यात एकाच षटकात एक चौकार दोन षटकार लगावणं सोपी गोष्ट नाही. त्याची निवृत्ती हा फार भावनिक क्षण होता," असं म्हटलं.
चषकाबरोबर फोटो काढतानाही धोनीनं तरुण खेळाडूंना पुढे उभे राहण्यास सांगितलं आणि तो मात्र स्वत: शेवटी अगदी मागे उभे होता.
धोनीने जडेजा आणि रायडूला कप स्वीकारायला बोलवल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.