R Madhavan Playing Ajit Doval: सध्या आर माधवनच्या या लूकची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर दिसत असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ही कथा खऱ्या आयुष्यात नेमकी कोणाची आहे? जाणून घेऊयात...
आर. माधवनचा हा लूक पाहून सर्वांनाच बसलाय आश्चर्याचा धक्का, मग या चित्रपटात रणवीर कोणाची भूमिका साकारतोय? खऱ्या आयुष्यातील 'ती' व्यक्ती कोण? सत्य जाणून छाती अभिमानाने फुलून येईल...
अभिनेता रणवीर सिंग बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या 'धुरंधर' या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला.
रणवीरबरोबरच या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपालही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून फर्स्ट लूकचा व्हिडीओ भारतात युट्यूबवर टॉप 10 व्हिडीओंमध्ये ट्रेण्ड करतोय.
'धुरंधर' चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये अजून एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ती म्हणजे अभिनेता आर माधवन आणि त्याचा लूक! चित्रपट हा 'सत्य घटनेपासून प्रेरित आहे' असं फर्स्ट लूकच्या व्हिडीओत म्हटलं आहे. तसेच आर.
माधवनचा 'धुरंधर'मधील लूक हा भारताचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी मिळता-जुळता असल्याने माधवन चित्रपटात डोवाल यांची भूमिका साकारतोय अशी चर्चा आहे. मात्र हा चित्रपट नेमक्या कोणत्या घटेवर अवलंबून असल्याचं सांगितलं जातंय हे अनेकांना ठाऊक नाही. त्याबद्दलच जाणून घेऊयत...
आर. माधवनचा लूक अजित डोवाल यांच्याप्रमाणे दाखवण्यात आला असून त्यांनी आयपीएल अधिकारी म्हणून कारकिर्दीला सुरुवात केलेली. त्यांनी इंदिरा गांधीच्या काळात राबवण्यात आलेल्या 1984 च्या ऑपरेशन ब्लू स्टारमध्येही महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यापासून अगदी आजपर्यंत डोवाल यांच्याकडे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित डोवाल यांच्यासारख्या लूकमध्ये आर माधवन चर्चेत आला असून तो काम करत असलेला 'धुरंधर' चित्रपट हा मेजर मोहित शर्मा यांच्या कामगिरीवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे.
मेजर मोहित शर्मा हे पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी इफ्तिकार भट हे नाव घेत पाकिस्तानमध्ये वास्तव्य केलं होतं. हीच भूमिका रणवीर साकारत असल्याची चर्चा आहे.
2005 मध्ये मोहित शर्मा यांनी इफ्तिकार नाव घेत अनेक गुप्त मोहिमा राबवल्या होत्या. त्यांना पाकिस्तानमध्ये जाऊन तिथल्या दहशतवाद्यांशी मैत्री केली. त्यानंतर याच दहशतवाद्यांचा त्यांनी एक एक करत खात्मा केला.
याच निर्भय आणि शूर मोहित शर्मा यांची भूमिका रणवीर साकारत असल्याची चर्चा फर्स्ट लूकमधील माहिती आणि घडामोडींच्या आधारे चाहत्यांमध्ये रंगली आहे. मात्र अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आता आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होईल त्यावेळेस याबद्दल अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा चित्रपट याच वर्षी 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (चित्रपटातील लूक्सचे सर्व फोटो युट्यूबवरुन साभार सौजन्य - जिओ स्टुडीओ)