Spirituality Facts : मंदिरात जाण्याआधी पहिल्या पायरीपुढे नतमस्तक का होतात?
Spirituality Facts : कोणत्याही मंदिरात किंवा धार्मिक स्थळी गेलं असता तिथं पादत्राणं बाहेरच काढून भाविक गर्भगृहाच्या दिशेनं पुढे जाऊ लागतात. यावेळी सर्वात पहिली कृती असते ती म्हणजे मंदिराच्या पायरीला पाया पडण्याची.
मंदिरात गेलं असता अनेकजण मंदिराच्या पहिल्या पायरीला पाया पडतात. हातांनी स्पर्श करून किंवा पायरीपुढे नतमस्तक होत नमस्तार केला जातो. अनेकदा मंदिराच्या पायरीला स्पर्श केलेले हात चेहऱ्यावरून फिरवले जातात किंवा दोन्ही हात जोडून अगदी त्याच क्षणी गर्भगृह किंवा मंहिराच्या कळसाकडे पाहिलं जातं. असं नेमकं का केलं जातं माहितीये?
काय आहे अध्यात्मिक महत्त्वं? मंदिरात जात असताना गर्भगृहाच्या दिशेनं भाविकांना वाट दाखवणाऱ्या आणि पुढे नेणाऱ्या या पायऱ्या जणू एक दुवा म्हणून तिथं काम करतात अशीच अनेकांची धारणा. म्हणूनच याच पायऱ्यांपाशी आल्यावर किंबहुना पहिल्या पायरीपाशी आल्यावर अनेकजण तिथं नतमस्तक होतात.
सनातन धर्मात मंदिर हे देवाचं निवासस्थान मानलं जातं. शिवाय हेच मंदिर साक्षात देवाच्या रुपाचंही प्रतिनिधीत्वं करतं. काही धार्मिक मान्यतांनुसार मंदिराचं शिखर देवतांचं मुख मानलं जातं, तर पायऱ्यांना भगवंताच्या चरणांचं प्रतीक समजलं जातं.
परिणामी मंदिराच्या शिखराकडे पाहताना कायमच अनेकजण डोळे भरून कळस पाहतात आणि मंदिराच्या पायरीपुढे नतमस्तक होताना अनेकांचेच डोळे मिटतात.
मंदिरातील पायऱ्यांशी काही शास्त्रीय कारणंसुद्धा जोडलेली असल्याचं सांगितलं जातं. मंदिरात प्रचंड प्रमाणात सकारात्मक उर्जेचा वावर असतो.
मंदिराच्या गर्भगृहापासून ते अगदी पायरीपर्यंत ही उर्जा प्रवाहित होत असते. परिणामी मंदिरात प्रवेश करता क्षणापासून या उर्जेच्या संपर्कात येण्याच्या हेतूनं पायरीला स्पर्श केला जातो आणि तिथंच अनेकदा नकारात्मक विचारांची साखळी तुटते. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)