Highest Railway Station: बापरे! कोण करतं अशा भयानक रेल्वे स्थानकावरून प्रवास? करावी लागते 16627 फूट इतकी चढाई. ऑक्सिजनमाक्सशिवाय इथं पोहोचणं अशक्यच
Highest Railway Station: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर जग बरंच पुढे आलं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रात जगाचा सर्वांगीण विकास झाला. रेल्वे विभागसुद्धा यात मागे राहिला नाही.
याच रेल्वे विभागाची किमया भारतीय रेल्वेनं जम्मू काश्मीरमध्ये बांधलेल्या अतिभव्य रेल्वेपुलाच्या माध्यमातूनही पाहायला मिळाली. आणि हाच रेल्वे विभाग एका अनोख्या स्थानकामुळं चर्चेचा विषय ठरत आहे.
हे रेल्वे स्थानक ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण पाहता जणू रेल्वे स्थानक आकाशातच आहे. कारण, तिथवर पोहोचण्यासाठी तब्बल 16000 फूटांचा चढाई करावी लागते.
जगातील सर्वाधिक उंचीवर असणारं हे रेल्वेस्थानक चीनमध्ये असून, त्याचं नाव आहे तांगगुला रेल्वे स्थानक. गोलमुंडला तिबेटची राजधानी ल्हासाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गावर हे स्थानक तयार करण्यात आलं असून, संपूर्ण जगासाठी ते आकर्षणाचा विषय आहे.
समुद्रसपाटीपासून या रेल्वे स्थानकाची उंची 16627 फूट इतकी असून, स्थानिक या रेल्वे स्थानकाला डांगला रेल्वे स्थानक म्हणूनही संबोधतात जे चिंगहई-तिबेट रेल्वेस्थानकावर बांधण्यात आलं आहे. उर्वरित चीनला जोडणारा हा पहिला रेल्वेमार्ग आहे.
या मार्गानं जाणाऱ्या ट्रेनमध्ये ऑक्सिजन मास्क असतात. अतिशय उंचीवर असल्या कारणानं क्विंघाई तिबेट रेल्वेमार्गावर हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण विरळ होत जातं. ज्यामुळं विमानाप्रमाणंच या मार्गावर प्रवाशांसाठी ऑक्सिजन मास्क ठेवण्यात येतो.
या रेल्वे स्थानकावर कोणीही कर्मचारी काम करत नसून, संपूर्ण स्थानक स्वयंचलित पद्धतीनं काम करतं. जुलै 2006 पासून सुरू झालेल्या या रेल्वे स्थानकाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.
सर्वाधिक उंचीवरील या रेल्वे स्थानकावर 3 रुळ असून, एका फलाटानं इथं काम होतं. इथं मधील रुळावर ट्रेन शंटिंग होऊन तिसरा ट्रॅक लहान फलाटासाठी आहे. 1.25 किलोमीटर इतक्या लांबीच्या या रेल्वे स्थानकावर 2010 पूर्वी कोणतीही प्रवासी ट्रेन येत नव्हती. मात्र आता इथं प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.