बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडमध्ये बराच काळ रंगली. ट्विंकल खन्नाने आक्षेप घेतल्यानंतर दोघांनी एकत्र काम करणंही थांबवलं.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांचं अफेअर हे फार गाजलं होतं. दोघांनी यावर कधीच भाष्य केलं नसलं तरी आजही बॉलिवूडमध्ये दबक्या आवाजात याची चर्चा होते. दरम्यान दिग्दर्शक-निर्माता सुनील दर्शन यांनी Bollywood Bubble ला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा त्यांच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
सुनील दर्शन म्हणाले की, अक्षय-प्रियंकाच्या अफेअरची बातमी जेव्हा चर्चेत आली तेव्हा त्यांच्या चित्रपटाच्या निर्मितीचं काम सुरू असल्याने त्यांना सर्वाधिक फटका सहन करावा लागला.
सुनील दर्शन यांनी यापूर्वीही अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्राच्या अफेअरवर भाष्य केलं असून. ट्विंकल खन्नाने त्यांच्या अफेअरच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सुपरस्टारला प्रियंकासोबत काम करण्यापासून रोखलं असल्याचं सांगितलं होतं.
बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "काही काळानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अशांतता निर्माण झाली. त्याने मला सांगितले की काही वैयक्तिक समस्या आहेत आणि त्यांच्यापैकी एकालाच घेऊन चित्रपट बनवता येईल का? मला वाटतं की सर्व कलाकारांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. विवाहित पुरुषांनी तर आणखी जबाबदार असलं पाहिजे. पण चुका करणं हा माणसाचा स्वभाव आहे. आणि निर्मात्यांना त्यांच्या चुकांचा फटका सहन करावा लागतो. त्या घटनेची जबाबदारी मी प्रियांकावर टाकू इच्छित नाही".
मी 'बरसात' चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती आणि अक्षय आणि प्रियांकासोबत एक गाणं शूट केलं होतं. पण परिस्थिती बदलल्यानंतर अक्षयने चित्रपट सोडला आणि मला बॉबी देओलला चित्रपटात घ्यावं लागलं असं सुनील यांनी सांगितलं होतं.
सुनील दर्शन यांनी अक्षय-प्रियंकाच्या अफेअरवर बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "प्रियंका चोप्रासोबत तो काम करू इच्छित नाही असं नव्हतं. पण परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली होती... लोकांनी, माध्यमांनी एका नात्याचा उल्लेख केला होता, ज्याची त्याच्या पत्नीला माहिती मिळाली. पण मला 18 महिने वाट पाहायला लावल्यानंतर त्याने अचानक मी चित्रपट करु शकत नाही सांगितल्यावर मला धक्का बसला".
"तो माझ्यासोबत पुढचा चित्रपट करणार असल्याचे सांगून त्याची भरपाई करू इच्छित होता, परंतु मला अक्षय असं करु शकतो यावर विश्वासच बसत नव्हता," असं ते म्हणाले.
सुनील दर्शन आणि अक्षय कुमार यांनी जानवर, एक रिश्ता, हाँ मैंने भी प्यार किया, तलाश, अंदाज यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. जवळपास दोन दशकं एकत्र काम केल्यानंतर त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं. अक्षय आणि प्रियांकाने अंदाज, ऐतराज आणि वक्त सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.