कबुतरांमुळे, विशेषतः त्यांच्या विष्ठा आणि पिसांमुळे काही गंभीर आरोग्यविषयक आजार होऊ शकतात. हे आजार नेमके कोणते आहेत हे जाणून घेऊयात.
मुंबईत सध्या कबूतरखान्यांचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद केले असताना जैन समाज आणि काही पक्षीप्रेमी याला विरोध करत आहेत.
दादरमध्ये तर जैन समाजाने रस्त्यावर उतरुन आक्रमक आंदोलन करत कबूतरखान्यांवर लावलेली ताडपत्री हटवली आणि पुन्हा एकदा खाद्य टाकण्यास सुरुवात केली.
हिस्टोप्लास्मोसिस (Histoplasmosis) हा एक बुरशीजन्य (फंगल) आजार आहे जो कबुतरांच्या वाळलेल्या विष्ठेतून हवेत पसरतो. विष्ठेतील बुरशी श्वासावाटे फुफ्फुसात प्रवेश करते, ज्यामुळे फुफ्फुसांचे इन्फेक्शन होते. ताप, खोकला, थकवा, छातीत दुखणे. गंभीर प्रकरणांमध्ये फुफ्फुसे कमजोर होऊ शकतात.
क्रिप्टोकॉकोसिस (Cryptococcosis) हादेखील बुरशीजन्य आजार आहे जो कबुतरांच्या विष्ठेतील क्रिप्टोकॉकस बुरशीमुळे होतो. श्वासावाटे बुरशी शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे फुफ्फुसे आणि मेंदू प्रभावित होऊ शकतात. डोकेदुखी, ताप, खोकला, आणि गंभीर प्रकरणांमध्ये मेंदूला सूज ही याची लक्षणं आहेत.
हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनिटिस (Hypersensitivity Pneumonitis) कबुतरांच्या विष्ठेतील बुरशी आणि पिसांमुळे फुफ्फुसांना ऍलर्जी आणि सूज येण्याचा आजार आहे. विष्ठेतील बुरशी किंवा कबुतरांचे पिसे श्वासावाटे शरीरात गेल्याने फुफ्फुसांना इजा होते. श्वास लागणे, खोकला, थकवा, आणि गंभीर प्रकरणांमध्ये फुफ्फुसांचे कायमस्वरूपी नुकसान होते.
कबुतरांच्या विष्ठेतील बुरशी आणि पिसांमुळे श्वसनमार्गात ऍलर्जी आणि दम्याचा त्रास होऊ शकतो. विष्ठेतील बुरशी आणि पिसांमुळे हवेत ऍलर्जन्स पसरतात, ज्यामुळे श्वसनमार्ग संवेदनशील होतात. खोकला, श्वास घेण्यास त्रास, त्वचेवर पुरळ, आणि डोळ्यांना खाज ही त्याची लक्षणं आहेत.
साल्मोनेलोसिस (Salmonellosis) कबुतरांच्या विष्ठेतून पसरणारं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे साल्मोनेला बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो. अतिसार, ताप, पोटदुखी, आणि उलट्या ही त्याची लक्षणं आहेत.
संशोधनानुसार, कबुतरांच्या विष्ठेमुळे सुमारे 60 प्रकारचे श्वसनाशी संबंधित आजार होऊ शकतात. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका असतो.